नागपूर – ‘अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयाचे निकाल जात असल्याने यामागची कारणे शोधण्याची आवश्यकता उद्भवली आहे. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार आहे’, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १२ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. पटोले यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे.
पटोले पुढे म्हणाले की, राज्य सरकार अनेक खटले हरत आहेत. त्यामुळे कुंभकोणी यांची भूमिका पडताळण्यात यावी आणि त्यांच्याविषयी फेरविचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेस पक्ष करणार आहे. यापूर्वी भाजपच्या सरकारमध्ये महाधिवक्ता तेच होते आणि महाविकास आघाडी सरकारमध्येही तेच कायम आहेत. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून केंद्र सरकारकडून ओबीसींच्या जनगणनेची माहिती मागवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल. ओबीसींच्या आरक्षणाचा केवळ ५ जिल्ह्यांचा प्रश्न नव्हे, तर संपूर्ण देशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आहे. पुढील सर्व निवडणुका ओबीसी आरक्षण कायम ठेवून घेण्यात याव्यात.