१२ सप्टेंबरला १ सहस्र ५२ जणांनी घेतली कोरोना लसीची पहिली मात्रा
पणजी, १३ सप्टेंबर (वार्ता.) – काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोरोना लसीची पहिली मात्रा देण्याचे प्रमाण १०० टक्के झाल्याचे घोषित केले होते; परंतु १२ सप्टेंबर २०२१ या दिवशी १ सहस्र ५२ रुग्णांना कोराना लसीची पहिली मात्रा दिल्याचे आढळून आले आहे. गोव्यात कोरोना लसीची पहिली मात्रा घेणार्यांचे प्रमाण १०० टक्के झाल्याविषयी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री यांनी गोव्याची स्तुती केली होती. या लसीकरणासंबंधी आरोग्य खात्याने १२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या कोरोनाविषयक प्रतिदिनच्या माहितीपत्रकात ‘१२ सप्टेंबर २०२१ या दिवशी एकूण ६ सहस्र ४६८ जणांना लस देण्यात आली. त्यांपैकी ११५२ जणांना लसीची पहिली मात्रा आणि ५३१६ जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली’, असे म्हटले आहे. आतापर्यंत लसीची पहिली मात्रा ९७.४२ टक्के जणांना देण्यात आली असून ३० सहस्र ८५१ जणांना ही लस देण्यात आलेली नाही, असे म्हटले आहे. ९ सप्टेंबर २०२१ या दिवशी केंद्रीय आरोग्य खात्याकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीमध्ये केंद्रीय आरोग्य सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्कीम, दादरा, नगर हवेली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी कोरोना लसीची पहिली मात्रा देण्याचे प्रमाण १०० टक्के आहे, तर त्रिपुरा, लडाख, दमण आणि दीव, तसेच लक्षद्वीप अन् उत्तराखंड या ठिकाणी हे प्रमाण ८९ टक्के आहे. मिझोराममध्ये हे प्रमाण ८६ टक्के आहे; मात्र यामध्ये गोवा राज्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता.