पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला चिपी येथील विमानतळाच्या कामाचा आढावा !

९ ऑक्टोबर या दिवशी होणार उद्घाटन

सिंधुदुर्ग विमानतळाचे प्रवेशद्वार

कुडाळ – वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे (सिंधुदुर्ग विमानतळाचे) ९ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी १२ सप्टेंबरला चिपी विमानतळाला भेट घेऊन कामाचा आढावा घेतला. या वेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांना पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘या विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, तसेच अन्य मान्यवर यांच्या हस्ते होणार आहे. या कामाच्या श्रेयवादाविषयी कोण काय म्हणतात, याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. विमानतळाचा विकास करणारे आस्थापन आय.आर्.बी.शी विमानतळ चालू करण्याविषयी चर्चा झाली आहे. तसेच एम्.आय.डी.सी.च्या माध्यमातून सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथून विमानसेवा चालू करण्यास कोणताही अडथळा नाही.’’