सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी दोडामार्ग तालुक्यातील श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्रशाळा, साटेली-भेडशी या शाळेत उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेले तथा दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि हितचिंतक श्री. दिग्विजय नागोजी फडके यांनाही ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यात आंबेखोल, देवगड येथील बापू सोनु खरात; माईन, कणकवली येथील प्रतीक्षा प्रसाद तावडे; वजराट, वेंगुर्ले येथील तेजस विश्वनाथ बांदिवडेकर; आंबेखोल, सावंतवाडी येथील नितीन नामदेव सावंत आणि सांगुळवाडी, वैभववाडी येथील स्नेहलता जगदीश राणे यांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन, तसेच गडमठ, वैभववाडी येथील संदीप जनार्दन शेळके यांना ‘विशेष पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. सावंत म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीला तिच्या धेय्यापर्यंत पोचवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय ! शिक्षकांमुळे भावी पिढी घडत असते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्यासह अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
श्री. दिग्विजय फडके यांचा परिचय
श्री. दिग्विजय फडके १६ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यातील साटेली-भेडशी शाळेत १० वर्षे अध्यापनाचे कार्य केले आहे. ते एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्य या स्तरांवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. सामाजिक कार्यातही ते सतत पुढे असतात. वर्ष २०२० मध्ये त्यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री शिक्षणरत्न पुरस्कार’ प्राप्त झाला होता. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची नोंद घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला.
श्री. फडके हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक असून नियमित नामजप, उपाय करतात. सकाळी ब्राह्ममुहुर्तावर उठून ते नियमित साधना करतात. सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्याचा लाभ शाळेत काम करतांना आणि वैयक्तिक जीवनातही झाला, असे श्री. फडके यांनी सांगितले. श्री. फडके हे शाळेत विद्यार्थ्यांनाही साधनेविषयी मार्गदर्शन करतात.