अयोध्येच्या रामजन्मभूमी आंदोलनात हिंदुत्वाचा उद्घोष सर्वार्थाने उत्कट झाला. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या समीकरणाचा उपहास करणार्या शरद पवार यांनी तेव्हा ‘रामजन्मभूमी आंदोलनाला दक्षिण भारतातून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही’, अशी अभद्र वाणी उच्चारली होती. प्रत्यक्षात संपूर्ण भारतवर्षाने हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केले. वर्ष २०१० मध्ये न्यायालयाने ‘हीच भूमी रामजन्मभूमी आहे आणि तेथील पूजा नित्यचालू राहिली पाहिजे’, असा निवाडा दिला. वर्ष १९९५ मध्ये ज्या न्यायसंस्थेने ‘भारताची जीवनपद्धती हिंदु भावविश्वाचा अविष्कार करणारी आहे’, असे सांगत या सनातन सत्यावर मोहोर उठवली होती, त्याच न्यायसंस्थेने अयोध्येविषयीही याच भावविश्वाचा धोशा सरळ सरळ मान्य केला. त्यावर काही पुरोगाम्यांनी ‘तर्कापेक्षा भावना शिरोधार्य मानण्यात आली’, असा गोंधळ केल्याचे सर्वांना ठाऊक आहे. याच मंडळींच्या सग्यासोर्यांनी ‘यापुढे अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व मिळेल’, या आशयाची कोल्हेकुई केल्याचे सगळ्यांच्या स्मरणात आहे. गेली ५ सहस्र वर्षे या भूमीत सर्वधर्मसमभाव प्रकटला आहे आणि कुणाही नागरिकावर पंथसंप्रदायाच्या नावावर कधी अन्याय झाला नाही. सर्वसामान्य हिंदूमात्राचे असे स्वागतशील मानस हीच इथल्या ‘सेक्युलॅरिझम’ची खरी ‘प्रॉमिसरी नोट’ (वचननामा) आहे.
भारताचा हा स्वभाव ‘यावतचंद्र दिवाकरौ’ (सूर्य-चंद्र असेपर्यंत) रहाणार आहे. तात्पर्य, शरद पवारांसारखे स्वकीय अथवा परकीय काहीही बोलले, तरी हिंदुत्व विचारांच्या माणुसकीचीच पूजा होईल. हिंदु भारतवर्षाच्या पाठीचा कणा आहे. हिंदुत्व हेच इथे राष्ट्रीयत्व आहे. आवश्यकता या भावविश्वाचे नित्य पूजन करण्याची आहे.
(साभार : ‘धर्मभास्कर’, दीपावली विशेषांक नोव्हेंबर-डिसेंबर २०११)