गोवा शासन शेतकर्‍यांना सौरऊर्जेवर चालणारे ११ सहस्र पंप विनामूल्य पुरवणार !

नीलेश काब्राल

पणजी, १२ सप्टेंबर (वार्ता.) – कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी गोवा शासन शेतकर्‍यांना सौरऊर्जेवर चालणारे ११ सहस्र पंप विनामूल्य पुरवणार आहे. विजेवर चालणार्‍या पंपांच्या जागी हे पंप वापरता येणार आहेत. गोवा शासनाच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला.

याविषयी अधिक माहिती देतांना पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल म्हणाले, ‘‘शासन शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात २ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. यासाठी निम्मे अनुदान देणारी योजना सिद्ध केली जाणार आहे. या योजनेसाठी शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाईन’ अर्ज मागवण्यात येणार आहेत. हे अर्ज आल्यानंतर अधिकारी शेतकर्‍याला प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करणार आहेत. शासन शेतकर्‍यांकडून सौरऊर्जा चांगल्या दराने खरेदी करणार आहे. याच प्रकारे खुल्या जागेवर, शासकीय किंवा खासगी इमारतींच्या गच्चीत किंवा वीज उपकेंद्रांच्या जवळ सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प नागरिकांनी उभारावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.’’ शासन घरोघरी एकूण १६ लक्ष ‘एल्.ई.डी.’ बल्ब पुरवणार गोवा शासन घरोघरी सौरऊर्जेवर चालणारे १६ लक्ष ‘एल्.ई.डी.’ बल्ब पुरवणार आहे. नागरिक वीजपुरवठा खंडित झाल्यास या बल्बचा वापर करू शकणार आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.