उपकेंद्राच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण चालू करण्याचा मानस ! – राज्यपाल
सावंतवाडी – येथे मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले. ‘मुंबई विद्यापिठाच्या या केंद्राला भविष्यात मोठे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जावेत’, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी या वेळी केले.
सावंतवाडी नगरपरिषद आणि ‘ॲडमिशन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीच्या इमारतीत हे उपकेंद्र चालू करण्यात आले आहे. या वेळी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, प्रकुलगुरु रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापिठाचे ‘सिनेट’ सदस्य हे ‘ऑनलाईन’ उपस्थित होते, तर पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या वेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा निसर्ग आणि समुद्रकिनारा लाभला आहे. येथे जे नाही, त्याविषयी खंत करत बसण्यापेक्षा येथे जे आहे, त्याच्या अनुषंगाने शिक्षण घेणे आवश्यक आहे. या उपकेंद्राला मोठे स्वरूप प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गुणवत्ता कायम उंचावत ठेवली पाहिजे. या उपकेंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण चालू करण्याचा मानस असून याविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’’
विविध प्रकल्प मार्गी लागत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला चांगले दिवस येणार ! – पालकमंत्री उदय सामंत
पालकमंत्री उदय सामंत या वेळी म्हणाले, ‘‘देशातील पहिली ‘ओशन युनिव्हर्सिटी’, वेंगुर्ला येथे होणार आहे. दोडामार्ग येथील आडाळी येथे मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे, तर ९ ऑक्टोबरला चिपी येथील विमानतळावरून (सिंधुदुर्ग विमानतळावरून) विमान उडणार आहे. यांसह आता मुंबई विद्यापिठाचे उपकेंद्र सावंतवाडीत चालू झाले आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला चांगले दिवस येणार असून शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या वेळी केले.
खासदार राऊत म्हणाले, ‘‘या उपकेंद्राला माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधू दंडवते यांचे नाव द्यावे. येथील विद्यार्थ्यांनी आता उच्च शिक्षणाचा लाभ घेणे आवश्यक आहे.’’ आमदार केसरकर म्हणाले, ‘‘या ठिकाणी विद्यापिठाचे उपकेंद्र तात्काळ चालू करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे तूर्तास सोय झाली असली, तरी भविष्यात विद्यापिठाच्या स्वत:च्या भूमीत उपकेंद्र असणे आवश्यक आहे. त्यासाठी आंबोली येथील ५० एकर शासकीय भूमीत हे उपकेंद्र कायमस्वरूपी उभारण्यात यावे. त्यामुळे आंबोलीतील जैवविविधतेचा अभ्यास करणे सोपे जाईल.’’