मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !

सर्वोत्तम शिक्षण कोणते ?

पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वोत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.       

(भाग ९)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/506791.html
पू. डॉ. शिवकुमार ओझा

२३. संशयात्मक बुद्धीमुळे योग्य निर्णय घेता न येणे

‘मनुष्य मानसिक वासनांनी घेरलेला असल्यामुळे मनुष्याची बुद्धी संशयात्मक रहाते. त्यामुळे त्याला कोणत्याही एका निश्‍चयापर्यंत पोचणे कठीण होते. प्रारब्धकर्मांच्या प्रभावामुळे बुद्धीला योग्य निर्णय घेणे कठीण होते.

२४. मनुष्य निर्णय घेण्यास असमर्थ ठरणे

बहुतेक वेळा मनुष्य स्वतः घेतलेले निर्णय पालटण्याचा प्रयत्न करतो किंवा काही काळ गेल्यानंतर त्याला स्वतःचे जुने निर्णय चुकीचे वाटू लागतात. मनुष्य बहुतेक वेळा योग्य निर्णय घेण्यात असमर्थ ठरतो. मनुष्याने सामूहिक स्वरूपात घेतलेेले निर्णयसुद्धा अनेक वेळा शेवटी त्रुटीयुक्त असल्याचे सिद्ध होतात.

२५. निर्णय नेहमी योग्य नसतात !

मनुष्य ज्याला आपला अंतरात्मा (Conscience) किंवा सामान्य ज्ञान (Common Sense) समजून निर्णय घेतो, तेसुद्धा नेहमी योग्य नसतात.

२६. विद्वान पुरुष किंवा समाज यांनाही योग्य निर्णय घेण्यास कठीण जाणे

अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितींमध्ये काय करणे लाभदायक आणि कल्याणकारक होईल ? याचा निर्णय घेणे मनुष्य अन् समाज यांच्यासाठी कठीण असते. आधुनिक जीवनातील अत्यंत विद्वान पुरुष किंवा समाज यांनाही पुष्कळशा समस्यांमध्ये योग्य निर्णय घेणे कठीण जाते.

२७. प्रत्यक्ष घटना पहाणार्‍या व्यक्तीलाही घटनेचे अचूक वर्णन करणे कठीण होणे

एखाद्या घटनेला प्रत्यक्ष पहाणार्‍या व्यक्तीला घटनेचे वर्णन करायला सांगितले, तर ती व्यक्ती त्या घटनेविषयी आपल्या भावनांनुसार व्यक्त होते. यामुळे घटनेतील सत्याचे वर्णन पुष्कळदा चुकीचेही केले जाते. मनोवैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे हे लक्षात आले आहे.

२८. चुकतो तो मनुष्य !

इंग्रजीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, ‘To err is human.’ म्हणजे चुकतो तो मनुष्य ! मनुष्याची बुद्धी कोणतेही कार्य करतांना अनेक चुका करतच असते.

२९. अनुभवाची विश्‍वसनीयता अधिक असणे

बौद्धिक तर्काद्वारे प्रतिपादित केलेल्या ज्ञानाच्या तुलनेत अनुभवांद्वारे प्राप्त केलेले ज्ञान किंवा सहजज्ञान (जे संत किंवा महात्मा यांच्याकडे असते) अधिक विश्‍वसनीय आणि प्रभावी असते. अनुभवी सांसारिक लोक किंवा संत-महात्मे यांच्या मार्गदर्शनाला लोक अधिक मानतात. रामकृष्ण परमहंस, रमण महर्षि, शिर्डीचे साईबाबा यांच्याकडेही पुष्कळशा बुद्धीजीवी व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यासाठी जात होत्या.

३०. लोकांमध्ये एखाद्या गोष्टीविषयी मतभिन्नता असल्याने निर्णय घेणे कठीण जाणे

कोणत्याही गोष्टीविषयी निश्‍चय करण्यास सांगितले, तर भिन्न-भिन्न लोक अनेक वेळा स्वतःची भिन्न-भिन्न मते व्यक्त करतात. यामुळे त्याविषयी योग्य निर्णय घेणे कठीण जाते.

३१. मनाची स्थिती क्षणोक्षणी पालटणे

मन क्षणोक्षणी पालटत असते. मनाला वाटते की, मी सर्वकाही जाणतो; पण हे सत्य कसे होऊ शकते ? (विवेकचूडामणि, श्‍लोक २९३)

३२. दुसर्‍याच्या बुद्धीवर विश्‍वास नसणे

लोक दुसर्‍या मनुष्याच्या बुद्धीवर विश्‍वास ठेवत नाहीत. त्यामुळेच एका आस्थापनाने बनवलेल्या वस्तूंची दुरुस्ती त्याच आस्थापनाच्या कारागिराकडून करवून घेण्यास प्रोत्साहन दिले जाते.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वोत्तम शिक्षा क्या है ?’)