नागपूर – ‘ईडा पीडा, माशी मोंगशे, रोगराई घेऊन जा गे मारबत..’ अशा घोषणेसह येथे ७ सप्टेंबर या दिवशी तान्हा पोळ्यानिमित्त प्रतिवर्षी काढण्यात येणारी काळ्या आणि पिवळ्या मारबतीची पारंपरिक मिरवणूक न काढता त्यांचे दहन केले.
‘काळ्या आणि पिवळ्या मारबतीचे दर्शन केल्याने अरिष्ट टळते’, अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे. विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा जपत गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने प्रतिवर्षी तान्हा पोळ्याला काळ्या, पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मारबतीच्या मिरवणुकीला प्रशासन आणि पोलीस यांनी अनुमती नाकारली. त्यामुळे १३८ वर्षांच्या या परंपरेत या वर्षीही खंड पडला. या वेळी इतवारी भागातील नेहरू चौक आणि जगनाथ बुधवारी परिसर येथे पुष्कळ गर्दी उसळली होती. सहस्रो लोकांच्या गर्दीवर महापालिका आणि पोलीस प्रशासन यांचे कुठलेच नियंत्रण नव्हते. बहुतांश लोकांनी मास्क घातलेला नव्हता.