जालना, बीड, नांदेड, परभणी येथे अतीवृष्टीसदृश पाऊस !

संभाजीनगर – मराठवाड्यातील जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आदी भागांत पुन्हा अतीवृष्टीसदृश पाऊस झाला. माजलगावसह बीड शहराची तहान भागवणार्‍या, तसेच शेतीसाठी बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील गावांना आधार ठरणारे माजलगाव धरण ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या धरणाच्या १६ दरवाजांतील ११ दरवाजे दोन मीटरने उघडून पाणी सोडण्यात आले. ८८ सहस्र ५०० क्युसेक्स वेगाने या ११ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीत चालू करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये वडीगोद्री आणि गोंदी या दोन गावांमध्ये अतीवृष्टीची नोंद करण्यात आली, तर दुसरीकडे बीड, परभणी, नांदेडच्या धरणांच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पाच्या ८ दरवाजांतून गोदावरी नदीपात्रात २ सहस्र ६९६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.