‘ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका’, असे आवाहन करणारे छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक !

अशा जातीद्वेषामुळेच भारतातील जातपात अद्याप संपुष्टात येऊ शकलेली नाही. जातपात नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची सूडबुद्धीची मानसिकता प्रथम नष्ट करणे आवश्यक ! – संपादक

नंदकुमार बघेल

रायपूर (छत्तीसगड) – मी भारतातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की, ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका. मी इतर सर्व समुदायांशीही यासंदर्भात बोलीन, जेणेकरून आपल्याला त्यांच्यावर बहिष्कार टाकणे शक्य होईल. ब्राह्मणांना ‘व्होल्गा’ नदीच्या तीरावर परत पाठवण्याची आवश्यकता आहे, असे ब्राह्मणद्वेषी विधान छत्तीसगड राज्याच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी नुकतेच केले होते. ‘व्होल्गा’ नदी रशियामध्ये असून युरोपमधील सर्वांत मोठी नदी म्हणून ती ओळखली जाते. ब्राह्मण किंवा आर्य हे युरोपातून आले, असा खोटा सिद्धांत जगभरात प्रचलीत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘ब्राह्मणांना परत भारताच्या बाहेर पाठवायला पाहिजे’, असे नंदकुमार बघेल यांनी सूचित केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्यांना येथील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. बघेल यांनी उत्तरप्रदेशमध्ये एका कार्यक्रमात हे विधान केले होते.

माझे वडील असले, तरी कायद्याच्या वर नाहीत ! – मुख्यमंत्री भूपेश बघेल

मुख्यमंत्री भूपेश बघेल

याविषयी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, या देशात कायदा सर्वोच्च आहे. माझे वडील ८६ वर्षांचे असले, तरीही त्यांनी एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात टिप्पणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मलाही दु:ख झाले आहे. (वडिलांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याविषयी बोलणे, हल्लीच्या राजकारणातील एक दुर्मिळ उदाहरण ! – संपादक)