लोकाभिमुख काम करणार्‍या वरवडे गावच्या तलाठी निलिमा सावंत यांना बढती

कणकवली – सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणार्‍या, तसेच कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणार्‍या तलाठी निलिमा सावंत यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तलाठी कार्यालयात आलेला कुणीही त्यांच्या कारकीर्दीत काम झाल्याविना मागे गेला नाही. (तलाठी निलिमा सावंत यांच्यासारखे किती प्रशासकीय अधिकारी प्रशासनात आहेत ? – संपादक) गाव पातळीवर, असे लोकाभिमुख काम झाले, तर सर्वसामान्यांचे प्रश्न सहजरित्या सोडवणे शक्य होईल, असे प्रतिपादन भाजपचे तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांनी केले.

तालुक्यातील वरवडे गावच्या तलाठी निलिमा सावंत यांचे बढतीपर (प्रमोशन) स्थानांतर ओरोस भूसंपादन विभागात झाले. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी वरवडे पंचायत समिती सदस्य राधिका सावंत यांच्या हस्ते निलिमा सावंत यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सिरील फर्नांडिस, अमोल बोन्द्रे, ग्रामसेवक पावसकर, पोलीस पाटील सावंत यांच्यासह वरवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. निलिमा सावंत यांनी त्यांच्या वरवडे गावातील तलाठी पदाच्या कारकिर्दीत केलेल्या सेवेविषयी सर्वांनीच गौरवोद्गार काढले, तसेच त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.