‘संचयनी’तील गुंतवणूकदारांना १०० दिवसांत न्याय मिळावा, यासाठी माझा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

१५ वर्षांनंतरही प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या

कणकवली – ‘संचयनी सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट’मध्ये गुंतवणूक केलेल्या गोरगरीब ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. त्यांना १०० दिवसांत न्याय मिळावा, यासाठी मी प्रयत्न करत आहे. संचयनीची जी संपत्ती कह्यात घेण्यात आली, त्यातून फसवणूक झालेल्या छोट्या गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत. अशा फसवणुकीच्या विरोधात केंद्रशासनाने केलेल्या कायद्याचा उपयोग करावा, अशी आमची मागणी आहे. ‘या प्रकरणाचा १०० दिवसांत निर्णय लावावा’, अशी मी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही विनंती करतो, असे प्रतिपादन माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केले.

माजी खासदार सोमय्या राज्यशासनातील काही मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी येथील प्रहार भवनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी भाजपचे आमदार नीतेश राणे आणि जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.
माजी खासदार सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘सचंयनीतील घोटाळ्याचा विषय संसदेत मी उपस्थित केला होता. त्याला आता १५ वर्षे झाली आहेत. या प्रकरणी तक्रार नोंद (केस रजिस्टर) झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने आतापर्यंत एकदाही सुनावणी झाली नाही. यातील एक आरोपी मोकाट आहे. त्याला फरार घोषित करा, यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. तो मोकाट आरोपी कोण ? याची माहिती आमदार नीतेश राणे १-२ दिवसांत घोषित करणार आहेत.’’ (भ्रष्टाचाराच्या विरोधातील प्रकरणावर १५ वर्षांनंतरही सुनावणी होत नाही, यातच खरी मेख आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ? – संपादक)

राज्य सरकारमधील १२ मंत्र्यांच्या विरोधात पुरावे !

सोमय्या म्हणाले की, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे समुद्रकिनारी नियमांचे उल्लंघन करून २ ‘रिसॉर्ट’ बांधली आहेत. ती कोणत्याही परिस्थितीत पाडावी लागणारच आहेत. ही बांधकामे वाचवता येत असतील, तर वाचवण्याचे धाडस राज्यातील ठाकरे सरकारने दाखवावे. परब यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही दिले आहेत. १२ मंत्र्यांच्या सूचीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड १२ वे आहेत.

कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

किरीट सोमय्या यांच्या कणकवली दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांची माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक (डिजिटल) फलक शिवसेनेच्या येथील कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला आहे. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात दंगल नियंत्रण पथकासह कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणुक आल्याने सोमय्यांकडून ‘ब्लॅकमेलिंग’ ! – वैभव नाईक, आमदार, शिवसेना

वैभव नाईक

कणकवली – मुंबई महानगरपालिकेमध्ये अनिल परब यांची शक्ती आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहनमंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ‘ब्लॅकमेलिंग’ करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ५३ कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केली होती. त्यांच्या चौकशीचे काय झाले ? केवळ शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे नेते यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी किरीट सोमय्या येथे आले आहेत, असा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.