अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध होऊ नये ! – भारताने तालिबानला बजावले

जिहादी आतंकवादी एकाच माळेचे मणी असतांना तालिबानच्या आश्वासनावर विश्वास ठेवणे धोकादायक ! – संपादक 

नवी देहली – अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी गेल्याच्या दुसर्‍या दिवशी भारत सरकारच्या प्रतिनिधींनी तालिबानच्या प्रतिनिधीची भेट घेतली. या वेळी एक घंटा झालेल्या बैठकीमध्ये ‘अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध किंवा आतंकवाद पसरवण्यासाठी होऊ नये’, असे भारताने तालिबानला स्पष्टपणे बजावले. तालिबानच्या आग्रहावरून कतारची राजधानी दोहा येथील भारतीय दूतावासात ही भेट झाली. या वेळी  भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानी नेता शेर महंमद अब्बास स्टॅनिकझई सहभागी झाला होता. स्टॅनिकझई कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तो ८० च्या दशकात भारतीय सैन्य अकादमीचा विद्यार्थी होता.

भारताने तालिबानची घेतली अधिकृत भेट !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ही भेट सुरक्षा, अफगाणिस्तानमध्ये रहात असलेले भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याक यांना परत आणणे या सूत्रांवर घेण्यात आली. ‘भारताच्या या सूत्रांवर सकारात्मकपणे विचार केला जाईल’, असे आश्वासन स्टॅनिकझई याने दिले.