चोर्‍या रोखण्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी ! – पोलिसांचे आवाहन

सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे चोरी करणार्‍याची ओळख पटून त्याला अटक करणे एकवेळ जमेल; पण चोरी कशी रोखणार ? – संपादक 

पणजी, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – सणासुदीच्या वेळी होणार्‍या चोर्‍या आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या परिसरात क्लोज सर्कीट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) यंत्रणा बसवावी, असे आवाहन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या सर्व महत्त्वाच्या वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षितपणे जमा करा, तसेच तुमच्या प्रवासाविषयी शेजार्‍यांना कळवा. सणाच्या वेळी होणार्‍या चोर्‍या टाळण्यासाठी राज्यभरातील निवासी संकुलांमध्ये आणि आसपास पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल.’’

पर्वरी येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरवर झालेल्या आक्रमणाविषयी ते म्हणाले, ‘‘आम्ही अशा प्रकरणी अतिशय कडक कारवाई करत आहोत. डॉक्टरवर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी आम्ही ३ जणांना अटक केली आहे. या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, हे आम्हाला कळले आहे. आम्ही आता पुढील अन्वेषण करत आहोत.’’