पणजी, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – टॅक्सीचालकांच्या प्रश्नाविषयी गोवा सरकार गणेशोत्सवाच्या आधी योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३० ऑगस्टला दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिवोली येथील भेटीच्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आम्ही यावर उत्तम उपाययोजना करू. टॅक्सीचालकांना कोणतीही अडचण येणार नाही. मी या प्रश्नात लक्ष घालत आहे. सर्व टॅक्सीचालक हे आमचे गोव्यातील बांधव आहेत. या प्रश्नाविषयी कायद्याच्या दृष्टीने आम्ही ॲडव्होकेट जनरल आणि वाहतूक संचालक यांच्याशी बोलणी करत आहोत. टॅक्सीचालकांना विश्वासात घेऊन या प्रश्नावर योग्य उपाययोजना केली जाईल.’’