मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
ठाणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – रस्त्यावर उतरून गोंधळ घालून ‘आशीर्वाद द्या हो, आशीर्वाद द्या’, असे म्हणून आशीर्वाद मिळत नाहीत, तर ते समाजसेवेतून मिळत असून त्यासाठी शिवसैनिक प्रयत्नरत असतात. आपल्या समोर कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतांनाही आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा काढल्या जात आहेत. लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतील, असे उपक्रम राबवले जात आहेत. देशात समाजकारणापेक्षा राजकारण १०० टक्के केले जात आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत भाजपला टोला लगावला. ठाणे येथे ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’च्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘ऑक्सिजन प्लान्ट’चे लोकार्पण ‘ऑनलाईन’ पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ‘शिवसैनिकांचा अभिमान वाटतो’, असे सांगितले.