संस्कृतची वैज्ञानिकता आणि समृद्धता यांकडे संपूर्ण जग आकर्षित होत आहे ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कृत सप्ताहानिमित्त विशेष ‘ट्विटर लाईव्ह’ कार्यक्रमाचे आयोजन

श्री. आनंद जाखोटिया

नवी देहली – ‘संस्कृत ही मृत भाषा आहे किंवा व्यवहार करण्यास निरुपयोगी आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे. आज जर्मनीच्या १४ आणि ब्रिटेनच्या ४ विश्‍वविद्यालयांमध्ये संस्कृत शिकवली जात असून १७ देशांमध्ये संस्कृतचा अभ्यास करण्यात येत आहे. संस्कृतची वैज्ञानिकता आणि समृद्धता यांमुळे संपूर्ण जग त्याकडे आकर्षित होत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.

भारत सरकारच्या वतीने ‘विश्‍व संस्कृत दिना’च्या निमित्ताने संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त हिंदु जनजागृती समितीने ‘ट्विटर लाईव्ह’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला संबोाधित करतांना श्री. जाखोटिया बोलत होते. या कार्यक्रमाचे ‘यू ट्यूब’च्या माध्यमातूनही थेट प्रक्षेपण करण्यात आले.

श्री. जाखोटिया पुढे म्हणाले, ‘‘संस्कृतचे स्वर आणि व्यंजन आपल्या शरीरविज्ञानाशी संबंधित आहेत. स्वर आणि व्यंजन यांचे लक्षपूर्वक उच्चारण केल्याने त्यामधून निघणार्‍या लहरी शरिराच्या विशिष्ट अंगातून अन् एका क्रमाने निघत असल्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. संस्कृतमध्ये विपुल शब्दसंपदा आहे, जी अन्य कोणत्याही भाषेमध्ये नाही. ही शब्दसंपदा व्यक्तीला आपला भाव प्रकट करण्यास शिकवते. जेव्हा आपण श्रीरामरक्षा, श्रीविष्णुसहस्रनाम अशा संस्कृत श्‍लोकांचे उच्चारण करतो, तेव्हा लयबद्धता, संस्कृत शब्दांपासून निघणारी ऊर्जा, चेतना, उत्साह आणि त्यांतून प्रकट होणारा भाव अनुभवतो. असे वैभव अन्य कोणत्याही भाषेचे आहे का ? म्हणून संस्कृतला ‘देववाणी’ किंवा ‘भाषांची जननी’ म्हटले गेले आहे. लोकांनी त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये संस्कृतचे अनुसरण करून ऋषीमुनींनी लिहिलेल्या विविध विषयांवरील प्राचीन शास्त्रांचा अभ्यास करून भारताला विश्‍वगुरु पदावर आसनाधिस्त करावे.’’

हा कार्यक्रम पहाण्यासाठीची ‘यू ट्यूब’ची लिंक : https://bit.ly/3y4P349