श्रीकृष्णा, काय करू रे, तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।

आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (३० ऑगस्ट) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. या निमित्ताने…

‘मला मागील २ – ३ दिवसांपासून श्रीकृष्णाची पुष्कळ आठवण येत होती. ‘श्रीकृष्णासाठी काहीतरी काव्यात्मक लिहूया’, असे मला वाटत होते; पण प्रयत्न करूनही मला ते जमत नव्हते. श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून बोलल्यावर मला पुढील ओळी सुचल्या. त्या मी श्रीकृष्णाच्याच श्रीचरणी अर्पण करते.

कु. श्रेया गुब्याड

श्रीकृष्णा, सतत तुझी आठवण येत आहे ।
तुझ्याशी पुष्कळ बोलावं, तुला सगळं
सगळं सांगावं, असं वाटत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। १ ।।

राधेसारखी प्रेममय भक्ती करावी,
असा विचार सतत येत आहे ।
स्वभावदोष आणि अहं यांमुळे,
खरंच रे मी अल्प पडत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। २ ।।

तुझ्या चरणांशी बसून तुझेच ध्यान करावे, असे वाटत आहे ।
हृदयाशी घट्ट धरून तुलाच अनुभवावे, असे वाटत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। ३ ।।

आता किती वेळा अजून हाका मारू ।
मला भेटायला, माझ्याशी बोलायला
तू धावून का येत नाहीस ।
कि असे करून ‘तळमळ वाढव’,
असे तू सांगत आहेस ।
कृष्णा, गोपाळा, नको ना अंत पाहू या जिवाचा ।
हा जीव तुझ्याशी एकरूप होण्यासाठीच व्याकुळ होत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। ४ ।।

– कु. श्रेया गुब्याड (वय २० वर्षे), सोलापूर (१३.१.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक