सिकरी (राजस्थान) जिल्ह्यामध्ये मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेवर पोलिसाने केला बलात्कार !

राजस्थान पोलिसांकडून महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचारांची अनेक प्रकरणे उघडकीस !

  • कुंपणच शेत खात असल्याचा हा संतापजनक प्रकार होय ! गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच जनतेवर अत्याचार केले, तर जनता न्याय कुणाकडे मागणार ? – संपादक 
  • अशा वासनांध पोलिसांना फाशीची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ? – संपादक 
  • पोलिसांकडून महिलांवर होणारे बलात्कार म्हणजे नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचे लक्षण – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

जयपूर (राजस्थान) – सिकरी जिल्ह्यातील श्रीमाधोपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एका मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. ठाणेदार कैलाश चंद यांनी सांगितले की, जयपूर येथील शाहपुरा क्षेत्रात चालक म्हणून कार्यरत असलेला कॉन्स्टेबल लालचंद हा पीडितेच्या शेजारी रहातो. त्याने १९ ऑगस्ट या दिवशी एका शेतामध्ये २३ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

वर्ष २०२१ मधील राजस्थान पोलिसांची महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे

१. २ मार्च २०२१ या दिवशी अलवरच्या खडेली पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह याने बलात्कार केल्याची घटना घडली.

२. मे २०२१ मध्ये मटीली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मनीराम याच्यावर बलात्काराचे आरोेप लावून एका महिलेने कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली.

३. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यामध्ये सरदार शहर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस निरीक्षकासह एकूण ८ पोलिसांच्या विरोधात प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवण्यात आला होता. या सर्वांवर एका महिलेला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता.

४. यावर्षी पोलीस उपायुक्त कैलाश बोहरा यांच्यावर ‘एका बलात्कार पीडितेकडे लाच मागणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे’ यांप्रकरणी अटक करण्यात आली होती.