मुंबई – वातावरणातील पालट, चक्रीवादळ आणि अवेळी पडणारा पाऊस लक्षात घेतला, तर वर्ष २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली असेल. त्यात मुंबई महापालिकेच्या ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या ४ प्रभागांचा समावेश आहे, अशी भीती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली आहे. ‘कफ परेड, मंत्रालय, नरिमन पॉईंट हे भागही २५ टक्के पाण्याखाली गेलेले असतील, म्हणजे गायब झालेले असतील. तो धोका दूर नाही’, असेही ते म्हणाले. (भविष्यात येणार्या आपत्काळाविषयी सनातन संस्था अनेक वर्षांपासून सांगत आहे. अनेक संतांनीही भविष्यातील आपत्काळाविषयी भविष्यवाणी केली असून यातून रक्षण होण्यासाठी मुंबईकरांनो, आतातरी वेळ न दवडता साधनेला प्रारंभ करा ! – संपादक)
याविषयी इक्बालसिंह चहल म्हणाले,
१. मागील ३१ वर्षांच्या काळात मुंबईसह राज्याला धोका निर्माण करणारे चक्रीवादळ कधीही झाले नव्हते; मात्र ३ जून २०२० या दिवशी झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने रायगडला पुष्कळ हानी पोचली. मुंबईतही त्याचे परिणाम झाले.
२. वर्ष १८९१ नंतर म्हणजे १२९ वर्षांनंतर मुंबईत पहिल्यांदाच चक्रीवादळ आले. मागील १५ मासांत ३ चक्रीवादळे आली. ६ ऑगस्ट २०२० या दिवशी चक्रीवादळासह झालेल्या पावसात नरिमन पॉईंटसह दक्षिण मुंबईत साडेपाच फूट पाणी जमा झाले.
३. आता संकट आपल्या दारावर येऊन ठेपले आहे. आताच आपण जागे झालो नाही, तर पुढची वर्षे धोकादायक आहेत. याचे परिणाम पुढच्या पिढीला नव्हे, तर आताच्या पिढीलाही भोगावे लागणार आहेत.