सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – विविध महामंडळांच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची कर्जाची प्रकरणे संमत करतांना अधिकोषांनी (बँकांनी) सकारात्मक मानसिकता ठेवून ती मार्गी लावावीत. कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, अशा पद्धतीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी २७ ऑगस्ट या दिवशी दिली.
विविध महामंडळांच्या योजना, तसेच संमत आणि प्रलंबित कर्ज प्रकरणे यांचा आढावा पालकमंत्री सामंत यांनी २७ ऑगस्ट या दिवशी घेतला. या आढावा बैठकीस शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक पी.के. प्रामाणिक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी.के. गावडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आनंद कर्णिक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सिद्धेश पवार यांच्यासह विविध बँकांचे समन्वयक उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘बँकांचे प्रतिनिधी, महामंडळांचे अधिकारी यांनी एकत्रित बसून आलेल्या कर्ज प्रकरणांविषयी सविस्तर आढावा घ्यावा. प्रत्येक अर्जावर निर्णय घेऊन त्याविषयी लाभार्थ्यांना कळवावे. प्रकरण होणार असेल, तर तात्काळ संमत करावे. होणार नसेल, काही त्रुटी असतील, तर त्याची पूर्तता करून घ्यावी. होणारच नसेल, तर का होणार नाही ? याची कारणे कळवावीत. बेरोजगार युवकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन त्याला स्वबळावर उभे करण्यासाठी बँकांनी सकारात्मक मानसिकतेतून कर्ज प्रकरणे संमत करावीत. बँकांविषयी येणार्या तक्रारींचे प्रमाण अल्प कसे होईल, याकडेही बँकांनी अवश्य पहावे. राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत.’’
क्रिया वाईट असेल, तर प्रतिक्रियाही वाईट होणार ! – पालकमंत्री उदय सामंत
जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत यांचे सूचक वक्तव्य
कणकवली – जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई करायची ? हे जिल्हाधिकारी ठरवतील. क्रिया (ॲक्शन) चांगली असेल, तर प्रतिक्रिया (रिॲक्शन) चांगली असणार आहे; मात्र क्रियाच वाईट असेल, तर प्रतिक्रियाही वाईट होणार, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात येत असलेल्या भाजपच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’च्या अनुषंगाने केले.
पालकमंत्री सामंत यांनी कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.