मुंबई – राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६० लाखांपर्यंत जाऊ शकते. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जाऊ शकते, असा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागाने वर्तवला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत ११ मार्चला ९१ सहस्र १०० नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तिसर्या लाटेत हाच आकडा मुंबईमध्ये दिवसाला १ लाख ३६ सहस्र, तर पुण्यामध्ये १ लाख ८७ सहस्र रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो.
तिसर्या लाटेत मुंबईसाठी २५० मेट्रिक टन, पुण्यासाठी २७० मेट्रिक टन, ठाण्यासाठी १८७ मेट्रिक टन, नागपूरसाठी १७५ मेट्रिक टन, तर नाशिकसाठी ११४ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते. तिसर्या लाटेमध्ये मुंबईमध्ये ८८ सहस्र ८२३ रुग्णांना गृहविलगीकरण, ४७ सहस्र ९२८ रुग्णांना रुग्णालयात आणि ९५७ रुग्णांना अतीदक्षता विभागात खाटांची आवश्यकता भासू शकते, असा अंदाज आहे. पुण्यामध्ये १ लाख २१ सहस्र रुग्णांना गृहविलगीकरण आणि १ सहस्र ३१४ रुग्णांना अतीदक्षता विभागात खाटांची आवश्यकता भासू शकते. ठाणे जिल्ह्यात तिसर्या लाटेत १ लाख ३ सहस्रांपर्यंत रुग्णसंख्या पोहोचू शकते आणि ९११ जणांना अतीदक्षता विभागात खाटांची आवश्यकता भासू शकते. नागपूरमध्ये रुग्णसंख्या १ लाख २१ सहस्र इतकी होऊ शकते, असाही अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागाने वर्तवला आहे.