साधना योग्य प्रकारे केली, तर ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली जातेच ! – परात्पर गुरु डॉ. आठवले‘अभ्यास केला, तर परीक्षेत उत्तीर्ण होतोच. त्याप्रमाणे साधना योग्य प्रकारे केली, तर ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली जातेच. यात कोणतेच आश्चर्य नाही. प्रगतीच्या विचारांपेक्षा प्रयत्नांची दिशा योग्य असायला हवी. साधनेत सातत्याने आणि निरपेक्षपणे प्रयत्न केल्यास साधनेतील आनंद अनुभवता येईल. साधक आश्रमात किंवा प्रसारात त्याच त्याच सेवा करतांना बाह्यतः दिसले, तरी ती सेवा अधिकाधिक परिपूर्ण, भावपूर्ण आणि अहंविरहित होत गेली की, त्यांची प्रगती होते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘काही साधकांना ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी लवकरात लवकर ६० टक्के व्हायला हवी’, असे वाटते. या अपेक्षेमुळे त्यांच्या मनातील नकारात्मक विचार वाढतात आणि साधनेसाठी अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत. ‘आपली पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असून अशी इच्छा मनी धरून सेवा किंवा साधना केल्यास मनातील अपेक्षांचे विचार वाढतात. या विचारांत अडकल्यामुळे साधकांची शिकण्याची स्थिती न्यून होते आणि भगवंत प्रत्येक क्षणी जे शिकवत आहे, ते शिकण्यापासून ते वंचित राहू लागतात.
‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्याच साधकांनी घेतलेला आहे. त्यामुळे साधकांनी या विचारांत न अडकता ‘व्यष्टी साधनेसाठी आवश्यक असलेला ‘भाव’ आणि समष्टी साधनेसाठी आवश्यक असलेली ‘तळमळ’ हे गुण आपल्या ठायी वृद्धींगत होत आहेत ना ?’, याचे निरीक्षण करावे अन् त्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२०)