तालिबानला अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यामागे पाकचा हात ! – अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव शॅबॉट

जे जगजाहीर आहे, ते सांगण्यापेक्षा ‘अमेरिका पाकच्या विरोधात काय कृती करणार आहे ?’ हे तिने सांगणे अधिक आवश्यक आणि अपेक्षित आहे ! – संपादक

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव शॅबॉट

वॉशिंग्टन (अमेरिका) – अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणामागे पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर यंत्रणा यांची महत्त्वाची भूमिका आहे, असा आरोप अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव शॅबॉट यांनी केला आहे. खासदार स्टीव शॅबॉट ‘हिंदू पॉलिटीकल अ‍ॅक्शन कमिटी’च्या एका ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना शरण देण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत केले.

खासदार शॅबॉट म्हणाले की, अफगाणिस्तानवर तालिबानने मिळवलेल्या नियंत्रणानंतर पाकिस्तानी अधिकार्‍यांनी विजय साजरा करणे हे अतिशय वाईट आहे. तालिबानची सत्ता आल्याने अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतील आणि त्याला उत्तरदायी पाकिस्तान आहे. अपहरण, धर्मांतर आणि अल्पवयीन मुलींचे अधिक वय असणार्‍या लोकांशी बलपूर्वक विवाह करून देण्याचे प्रकार अल्पसंख्यांकांसमवेत होऊ शकतात.