भारताच्या गौरवशाली इतिहासाची अद्भुत साक्ष असलेल्या विजयदुर्गच्या इतिहासाला व्यापक प्रसिद्धी मिळणे आवश्यक !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. मराठ्यांच्या इतिहासामध्ये विजयदुर्ग किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘कोकणकिनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. आधी याला किल्ले ‘घेरिया’ असे म्हटले जायचे. असे मानले जाते की, शिलाहार राजवटीचे राजा भोज यांनी वर्ष ११९२ ते १२०५ या प्रदीर्घ कालावधीत हा किल्ला बांधला. त्यानंतर तो देवगिरीचे यादव आणि नंतर विजयनगर साम्राज्य यांच्या अधीन होता. वर्ष १४३१ मध्ये आदिलशहाने कह्यात घेऊन त्याला महत्त्वाचे ठाणे (केंद्र) बनवले. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी वर्ष १६५३ मध्ये हा किल्ला कह्यात घेतला आणि त्याचे नामकरण ‘विजयदुर्ग’ असे केले. जे महत्त्व भूमीवरील किल्ल्यांमध्ये प्रतापगड किंवा रायगड यांचे आहे, तेच महत्त्व सागरी आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये ‘विजयदुर्ग’चे आहे, असे म्हणणे योग्य होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमांमध्ये आणि आरमारी (नौदल) इतिहासामध्ये विजयदुर्गला अत्यंत महत्त्व आहे.

सध्याचा विजयदुर्ग किल्ला आणि गोलात दाखवलेली संरक्षक भिंतीची होत असलेली पडझड

२. शत्रूंची जहाजे थोपवण्यासाठी विजयदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण दगडी भिंत हा स्थापत्यक्षेत्रातील अद्भुत ठेवा !

गोव्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ या शासकीय संस्थेने वर्ष १९९८ मध्ये विजयदुर्ग आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश यांची पहाणी केली. या पहाणीत त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या. त्याविषयी त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाला ऑस्ट्रेलियातील काही मासिकांनीही प्रसिद्धी दिली आहे. दुर्दैवाने आपल्याकडे मात्र त्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. या संस्थेच्या संशोधकांनी (सिला त्रिपाठी, एम्.के. सक्सेना, सुंदरेश पी. गुडीगर आणि एस्.एन्. बांदोडकर यांनी) सिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणे विजयदुर्ग किल्ल्यातील खुल्या समुद्रात सागरी आक्रमण थोपवण्यासाठी विविध दगडांनी रचलेली १२२ मीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत आढळून आली. त्या भिंतीतील काही दगड छोटे, तर काही मोठे होते. छोटे दगड मोठ्या दगडांच्या मध्ये ठेवण्यात आलेले होते, जेणेकरून ही भिंत पडणार नाही. काळानुसार काही ठिकाणी हे बांधकाम मोडकळीस आलेले आहे किंवा त्याची झीज झालेली आहे. ही भिंत मराठ्यांच्या काळामध्ये बांधण्यात आली असावी, अशी शक्यता आहे. मोठ्या लाटांपासून किल्ल्याला वाचवण्यासाठी, तसेच शत्रूची जहाजे आल्यास त्यांना आधीच थोपवण्यासाठी किंवा बुडवण्यासाठी ही भिंत बांधण्यात आली असावी. त्या काळी समुद्राच्या पाण्याखाली झालेले हे बांधकाम अत्यंत महत्त्वाचे मानले पाहिजे. त्या काळी मोगल, ब्रिटीश किंवा पोर्तुगीज यांची जहाजे आकाराने अवाढव्य असत. त्यामुळे पाण्याखाली असलेला त्यांच्या तळाचा भाग या भिंतीवर आपटून फुटणे शक्य होते. हा धोका मराठी आरमाराला (नौदलाला) नव्हता; कारण मराठ्यांचे आरमार गनिमी काव्याच्या तंत्राने लढत असल्यामुळे त्यांच्या नावा हलक्या आणि लहान आकाराच्या होत्या. त्यामुळे मराठ्यांच्या बांधकाम इतिहासातील हे एक अद्भुत नियोजन मानले गेले पाहिजे. आजघडीला याविषयी कोणतीही चर्चा होत नाही. हे अहवाल कुठल्यातरी कपाटामध्ये जीर्ण होत चालले आहेत.

संशोधन अहवालात उल्लेख केलेल्या गोदीचे (डॉकयार्डचे) रेखाटन

 

समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या दगडी भिंतीच्या भागाचे रेखाटन

३. विजयदुर्ग हा केवळ किल्ला नसून भरभराटीला आलेले एक बंदर असल्याची साक्ष संशोधनातून मिळणे !

या संशोधनाप्रमाणे या किल्ल्यापासून साधारणपणे ३ किलोमीटर अंतरावर वाघोटण नदीमधील गोदी (डॉकयार्ड) देखील मराठ्यांनी बांधली होती. या गोदीमध्ये मराठ्यांच्या नावांची देखभाल आणि दुरुस्ती होत असे. या गोदीचा तळ चुन्याचा बनवलेला आहे. भरती आणि ओहोटी यांचे गणित लक्षात घेऊन गोदीमध्ये जहाजे आणली जात होती. तेथे एक ओढाही बांधला होता, त्यामधून गोदीतील अतिरिक्त पाणी वाहून जात असे. त्यामुळे जहाज दुरुस्तीच्या वेळी जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढेच पाणी गोदीमध्ये रहात होते. असेही म्हटले जाते की, या किल्ल्यावरूनच ‘हेलियम’चा शोध लावण्यात आला. त्या संशोधानासाठी जे बांधकाम करण्यात आले, त्याला अजूनही ‘साहेबाचे ओटे’ असे नाव आहे.

या ठिकाणी केलेल्या उत्खननामध्ये जहाजांचे नांगर टाकण्यासाठीचे दगडी बांधकाम (जहाज उथळ पाण्यात स्थिर ठेवण्यासाठी जहाजाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूस एक किंवा दोन वजनदार पोलादी नांगर ठेवलेले असतात. हे नांगर अडकवून जहाज स्थिर रहावे, यासाठी प्रत्येक बंदरावर आणि गोदीत विशिष्ट सोय करतात.), चिनी बनावटीच्या वस्तू आढळून आल्या आहेत. यावरून विजयदुर्ग केवळ एक किल्ला नव्हता, तर त्या काळी भरभराट झालेले बंदरही होते, याची साक्ष मिळते. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मराठा आरमाराला (नौदलाला) प्रभावी बनवून इंग्रज, सामुद्री चाचे, जंजिर्‍याचे सिद्धी, पोर्तुगीज अशा सागरी सत्तांना शह दिला होता.

आजमितीला यावर प्रकाश टाकणारे पुरेसे साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे एवढ्या महान गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोचणे शक्य झाले नाही.

४. विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास जनसामान्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !

या लेखात नमूद केलेली सूत्रे केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नाहीत, तर ऐतिहासिक आणि नाविक अशा अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहेत. हे कोकणचे वैभव आणि इतिहास आहे. ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या स्वारीला मूठभर नाविकांनी विजयदुर्गावरून कशी मात दिली, याची माहिती आज कोकणवासियांनाही नाही. किल्ल्यावर पर्यटन विकास महामंडळाने उभारलेला एक जुनाट फलक उभा आहे. आज विजयदुर्गविषयीच्या संशोधनाला व्यापक प्रसिद्धी देण्याची आवश्यकता आहे. वर्ष १९९८ मध्ये झालेल्या या संशोधनाला आधारभूत धरून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढील संशोधन होणे, तसेच हे ऐतिहासिक लढे आणि स्थाने यांच्या इतिहासांचा समावेश पाठ्यपुस्तकांमधून होणे आवश्यक आहे. या ऐतिहासिक स्थानाची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्य शासन यांच्या संकेतस्थळांवर रोचक पद्धतीने छायाचित्रांसह प्रसिद्ध झाल्यास विजयदुर्गचा इतिहास पुन्हा जिवंत होण्यास वेळ लागणार नाही.’

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद.

विजयदुर्गचा इतिहास पुनरुज्जीवित व्हावा, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेचे शासनाला निवेदन

‘विजयदुर्गच्या संदर्भात वर्ष १९९८ मध्ये झालेल्या संशोधनाला व्यापक प्रसिद्धी मिळावी, आधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने यासंदर्भात अधिक संशोधन व्हावे, तसेच विजयदुर्गवरून दिल्या गेलेल्या लढ्यांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट व्हावा’, अशा मागण्यांचे निवेदन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने राज्य शासनाची गड-किल्ले जतन आणि संवर्धन समिती, तसेच पर्यटन अन् सांस्कृतिक कार्य विभाग यांना ५.८.२०२१ या दिवशी देण्यात आले आहे.

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर