पाकच्या ग्वादर शहरातील बॉम्बस्फोटात ८ चिनी अभियंते ठार !

  • बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आक्रमणाचे दायित्व स्वीकारले !

  • भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये ! – चीनची पाकला चेतावणी

  • पाकच्या बलुचिस्तान प्रांतात चीन राबवत असलेल्या प्रकल्पाला तेथील बलुची लोकांचा पूर्वीपासून विरोध आहे. पाक सैन्याने बलुची लोकांवर अत्याचार केले. या सर्व गोष्टींचा बलुची लोक अशा प्रकारे सूड उगवत आहेत. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी सशस्त्र कारवाया करणार्‍या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने भविष्यात अशा प्रकारे आणखीन आक्रमणे केल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक 
  • चीन भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकच्या आतंकवाद्यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठराखण करतो; मात्र त्याच चीनच्या नागरिकांना पाकमधील सशस्त्र संघटना लक्ष्य करते ! चीनला हे समजेल, तो सुदिन ! – संपादक

नवी देहली – पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या शहरात २० ऑगस्टच्या रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ८ अभियंते ठार झाले. या आक्रमणाचे दायित्व ‘बलूचिस्तान लिबरेशन आर्मी’ या संघटनेने घेतले आहे. चिनी अभियंत्यांवर करण्यात आलेले हे आतापर्यंतचे दुसरे आक्रमण आहे. यापूर्वी पाकच्या कोहिस्तान जिल्ह्यातील दासु येथे करण्यात आलेल्या स्फोटात ९ चिनी अभियंते ठार झाले होते. या आक्रमणानंतर चीनने अन्वेषणासाठी त्याचे पथक पाकमध्ये पाठवले होते. आताही चीनने या आक्रमणावर संताप व्यक्त करत या आक्रमणाचे संपूर्ण अन्वेषण करून दोषींना न्यायालयाद्वारे शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ‘भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये’, अशी चेतावणही चीनने दिली आहे. चीनच्या इस्लामाबाद येथील दूतावासाकडून सांगण्यात आले की, चीनच्या नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी त्यांना अधिक सुरक्षा देण्यात यावी.