कारगिल युद्धाची विजयगाथा !

२६ जुलै या दिवशी कारगिल युद्धाचा ‘विजय दिवस’ साजरा झाला. समुद्रसपाटीपासून अतिशय उंच ठिकाणी हे युद्ध १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण सैनिकांनी लढले. त्यांनी केवळ शूरता आणि नेतृत्व या गुणांवर महापराक्रम गाजवून हे युद्ध जिंकले. यात हौतात्म्य पत्करणार्‍या अनेक सैनिकांना विविध शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. कारगिल युद्धातील हे महानायक धैर्याने प्रतिकूल परिस्थितीला कसे सामोरे गेले ? याचे वर्णन आणि या युद्धाची विजयगाथा लेखात मांडली आहे. या महानायकांचा आदर्श घेऊन सर्वांनी देशरक्षणासाठी सिद्ध व्हावे !

 

टायगर हिल

१. २२ वर्षांपूर्वी भारतीय सैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानी सैनिकांचा पराभव करून कारगिल युद्ध जिंकणे

कारगिल युद्धाला २२ वर्षे पूर्ण झाली; पण या युद्धाची विजयगाथा अजूनही भारतियांच्या मनामध्ये जिवंत आहे. २६ जुलै १९९९ या दिवशी भारतीय सैन्याने शेवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारले आणि कारगिलमधील पाकिस्तानची घुसखोरी पूर्णपणे संपवली. तेव्हापासून २६ जुलै या दिवशी ‘ऑपरेशन विजय’ किंवा ‘कारगिल दिवस’ साजरा केला जातो. काश्मीरची नियंत्रण रेषा ४८० किलोमीटरची असून तेथे भारताचे २ लाख सैनिक पहारा देतात; परंतु याहून दुप्पट सीमा असलेल्या कारगिल सीमेवर केवळ एक ब्रिगेड म्हणजे ५ सहस्र सैनिक तैनात होते. ज्या उंच ठिकाणी भारतीय सैनिक तैनात नव्हते किंवा बर्फ पडल्याने ते परत आले होते, अशा टेकड्यांवर पाकिस्तानने घुसखोरी करून तेथे सैनिकांना तैनात केले. कारगिल आणि लेह ही ठिकाणे १३ सहस्र ते १८ सहस्र फूट उंचीवर असून तेथे ६ मास बर्फ पडतो. त्या वेळी तेथील तापमान हे ‘- ४० सेंटीग्रेड’ एवढे असते. तसेच तेथे ६ ते ८ फूट बर्फ साचलेला असतो. त्यामुळे तेथील भारतीय सैनिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. भारतीय सैन्याचे ‘कर्तव्यमान साहस’ हे ब्रीदवाक्य असल्याने ते देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच सिद्ध असतात.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. तत्कालीन भारत सरकार पाकिस्तानसमवेत शांतीची कबुतरे उडवत असतांना पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करणे

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक युद्धे झाली. भारतीय सैन्याने वर्ष १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ चे कारगिल युद्ध अशी ४ युद्धे पाकिस्ताच्या विरोधात लढली. या चारही युद्धांमध्ये भारताचा विजय झाला. कारगिल युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते. त्यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे.

भारत-पाक पडोसी साथ साथ रहाना है,
प्यार करे या वार करे दोन्हों को ही सहना है ।

जो हम पर गुजरी बच्चों के संग ना होने देंगे
जंग ना होने देंगे जंग ना होने देंगे ।।

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत अन् त्यांच्यात युद्ध होऊ नये, असे तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना वाटत होते. त्यामुळे या दोन देशांमध्ये सौहार्द वाढावे, यासाठी त्यांनी लाहोर बसयात्रा चालू केली. या यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी वरील कविता म्हटली होती. एकीकडे ते ही कविता म्हणत असतांनाच दुर्दैवाने पाकिस्तानचे सैनिक कारगिलमध्ये घुसखोरी करत होते.

३. आतंकवाद्यांनी घुसखोरी केली आहे, असे दाखवण्यासाठी पाकिस्तानच्या सैनिकांनी आतंकवाद्यांच्या वेषात घुसखोरी करणे

कारगिल हे समुद्रसपाटीपासून १३ ते १८ सहस्र फूट उंचीवर असल्याने तेथे विविध हिमनद्या आहेत. या भागांमध्ये पूल अल्प आहेत. शत्रूने एखादा पूल उडवला, तर नद्या पार करणे सोपे नसते. तेथे झाडे उगवत नाहीत. ऑक्सिजन अल्प प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्याने उंच कड्यांवरून चढाई करून लढाई केली. भारताचा श्रीनगर-लेह हा राष्ट्रीय महामार्ग कारगिलवरून लेहला जातो. या मार्गावर ६ मास बर्फ पडत असल्यामुळे तो तेवढा काळ बंद असतो. तेथे हेलिकॉप्टर्स, खेचर (प्राणी) आदी वाहनांचा वापर करावा लागतो किंवा मनुष्याला स्वतःच्या पाठीवर साहित्य घेऊन जावे लागते. आता तेथे ‘जोझिला’ बोगदा होत असल्याने ही अडचण दूर होईल. पाकिस्तानला काश्मीरमध्ये आतंकवाद पुनर्जीवित करायचा होता. त्यासाठी सियाचीन ग्लेशिअरकडे जाणार्‍या रस्त्याला अडवून सियाचीन आणि कारगिल यांना भारतापासून वेगळे करणे, हा पाकिस्तानचा डाव होता. त्यामुळे ज्या भागात भारतीय सैनिक नव्हते, अशा ठिकाणी पाकिस्तानी सैनिक घुसवण्यात आले. ही घुसखोरी आतंकवाद्यांनी केल्याचे भासवण्यासाठी पाकिस्तानने त्याच्या सैनिकांना आतंकवाद्यांच्या वेषात पाठवले. त्यांना या भागात लढण्याचा अनुभव होता. त्यांनी स्नो स्कूटर्स, हेलिकॉप्टर्स, खेचर यांचा वापर करून गुपचूप घुसखोरी केली. त्यानंतर सैनिकांना तेथील शिखरावर तैनात केले. या युद्धात पाकिस्तानने १५ सहस्र सैनिक वापरले. पाकिस्तानचे जे सैनिक मारले गेले, त्यांचे मृतदेहही पाकिस्तानने परत घेतले नाहीत. तेथे प्रचंड डोंगराळ भाग होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची मोठी शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे किंवा वायूदल यांचा तेथे उपयोग नव्हता. हे युद्ध पायदळाचे होते. पाकिस्तान सैन्यावर आक्रमण करून त्यांना थांबवावे लागायचे. या युद्धात भारतीय सैनिकांनी विविध पराक्रम गाजवले. यात ५४३ भारतीय सैनिक आणि अधिकारी हुतात्मा झाले, तर १ सहस्र ३०० हून अधिक सैनिक गंभीर घायाळ झाले. हे सर्व १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण होते. त्यांना ४ परमवीरचक्र, ४ महावीरचक्र, २९ वीरचक्र आणि ५२ सेना पदके बहाल करून गौरवण्यात आले.

४. कारगिल युद्धातील महानायक !

कॅप्टन सौरभ कालिया

४ अ. कॅप्टन सौरभ कालिया यांच्यामुळे कारगिलमधील घुसखोरी समजणे : युद्धात शस्त्र आणि शस्त्र वापरणारा सैनिक हे दोन पैलू असतात. शस्त्र वापरणारा सैनिक हा त्याच्याकडील शस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. नेमके तेच या युद्धात झाले. कॅप्टन सौरभ कालिया हे काही सैनिकांसमवेत गस्त घालत होते. तेव्हा त्यांनी तेथे पाकिस्तानी सैन्याला पाहिले. कॅप्टन कालिया त्यांच्याशी शूरपणे लढले; पण यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्यामुळे कारगिलमध्ये घुसखोरी झाल्याचे भारताला समजले.

कॅप्टन विक्रम बत्रा

४ आ. देशासाठी प्राण अर्पण करणारे कॅप्टन विक्रम बत्रा ! : कॅप्टन विक्रम बत्रा हे या युद्धाचे पहिले महानायक होते. त्यासाठी त्यांना या युद्धात परमवीरचक्र मिळाले. त्यांचे सहकारी त्यांना ‘शेरशहा’ म्हणायचे. ते केवळ १८ मासांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते. ते म्हणाले होते, ‘या युद्धात एकतर भारताचा विजय होईल किंवा माझे पार्थिव तिरंग्यामध्ये गुंडाळून आणले जाईल.’ त्यांना ‘पॉईंट ५१४०’ हे शिखर कह्यात घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांना मारले आणि विजय मिळवला. हे शिखर कह्यात घेतल्यानंतर एका पत्रकाराने कॅप्टन बत्रा यांना विचारले की, यापुढे तुम्हाला काय करायचे आहे ? तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘ये दिल मांगे मोअर ! यानंतर आम्हाला पॉईंट ४८७५ (शिखर) जिंकायचे आहे.’’ त्या वेळी बत्रा यांनी लग्न झालेल्या सैनिकांना ‘मोहिमेवर येऊ नका’, असे सांगितले. ते स्वत: तेथे जाऊन लढले. हे शिखर भारताने हस्तगत केले; परंतु कॅप्टन बत्रा जिवंत परत आले नाहीत. या युद्धाचे पहिले परमवीरचक्र त्यांना देण्यात आले.

कॅप्टन विजयंत थापर

४ इ. तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणे कड्यावरून चढून कॅप्टन विजयंत थापर यांनी पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण करणे : कॅप्टन विजयंत थापर यांना टोलोलिंग शिखर सर करण्याचे दायित्व देण्यात आले होते. टोलोलिंग यशस्वी सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची कामगिरी देण्यात आली. या लढाईत त्यांचे कंपनी कमांडर मेजर आचार्य कामी आले. त्यासाठी त्यांना महावीरचक्र देऊन गौरवण्यात आले. लढाईला जाण्यापूर्वी सर्व सैनिकांनी करणीमातेसमोर शेवटची प्रार्थना केली. टोलोलिंगची लढाई अतिशय शूरपणे लढली गेली. ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे एका कड्यावरून सिंहगडावर चढले होते, तसे कॅप्टन थापरही वर चढले आणि संधी मिळताच त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण केले. हा महापराक्रम गाजवतांना त्यांना वीरमरण आले. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले, ‘हे युद्ध झाल्यानंतर तुम्ही या स्थानाला नक्की भेट द्या आणि भारतीय सैन्य हे किती कठीण ठिकाणी लढले आहे, ते बघा !’ सध्या त्यांचे वडील कर्नल थापर हे ८२ वर्षांचे आहेत. ते प्रत्येक वर्षी २६ जुलै या दिवशी तेथे जाऊन त्यांचा मुलगा आणि वीर सैनिक यांना श्रद्धांजली वाहतात.

४ ई. मृत्यूशी दोन हात करणारे कॅप्टन मनोजकुमार पांडे ! : या युद्धात कॅप्टन मनोज कुमार पांडे हुतात्मा झाले. खालोबार टेकडी अतिशय महत्त्वाची होती. त्या टेकडीवर कॅप्टन पांडे यांनी त्यांच्या सैनिकांसमवेत आक्रमण केले. त्यांनी एकापाठोपाठ असे ४ खंदक (बंकर) जिंकले. लढतांना कॅप्टन पांडे यांना गोळी लागली. अशा अवस्थेतही त्यांनी त्यांच्या सैनिकांना नेपाळी भाषेत सांगितले, ‘ना छोडनु’, म्हणजे ‘तुम्ही शत्रूला सोडू नका.’ शेवटी २४ वर्षांचे मनोजकुमार पांडे यांना तेथे वीरमरण आले.

४ उ. कारगिल युद्धातील सर्वांत महत्त्वाचे टायगर हिल जिंकणारे योगेंद्रसिंह यादव ! : योगेंद्र सिंह यादव यांनी त्यांच्या घातक तुकडीसमवेत टायगर हिलवर आक्रमण केले. लेफ्टनंट बलवंत सिंह यांना या युद्धात महावीरचक्राने गौरवण्यात आले. योगेंद्रसिंह यादव यांनी टायगर हिल हस्तगत केले. त्यांना या युद्धात परमवीरचक्र देण्यात आले. सुदैवाने ते हयात आहेत. रायफलमॅन संजय कुमार जे आज सुभेदार मेजर आहेत, त्यांनी मश्कोह खोर्‍यातील पॉईंट ४८७५ शिखर कह्यात घेतले. त्यांनी तेथे ३ आतंकवाद्यांना ठार केले. त्यांनाही परमवीरचक्र देण्यात आले.

कॅप्टन अनुज नायर

४ ऊ. १६ सहस्र फूट उंचीवरील शिखर जिंकणारे कॅप्टन अनुज नायर ! : या युद्धात कॅप्टन अनुज नायर यांना टायगर हिलच्या पश्चिमेला असलेले ‘पॉईंट ४८७५’ खाली करण्याची कामगिरी देण्यात आली. ते पाकिस्तानी सैनिकांनी कह्यात घेतले होते. कॅप्टन नायर यांनी त्यांचे दायित्व चोख बजावून ‘पॉईंट ४८७५’ शिखर हस्तगत केले. या लढाईत त्यांनाही वीरमरण आले. त्यासाठी त्यांना महावीरचक्र देण्यात आले. टायगर हिल हे अतिशय महत्त्वाचे होते. या लढाईत नायर यांच्यासमवेत अनेकांनी सहभाग घेतला होता. युद्ध संपल्यावर असे लक्षात आले की, भारताने पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले आहेत. उरलेल्या सैनिकांना हाकलून लावले. पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे ७७२ सैनिक ठार झाले, तर १ सहस्रांहून अधिक घायाळ झाले. कालांतराने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सांगितले होते, ‘आमचे १ सहस्र ५०० हून अधिक सैनिक मारले गेले.’ भारताचे ५७६ सैनिक हुतात्मा झाले, तर १ सहस्र १२२ सैनिक गंभीर घायाळ झाले. भारताचे २५ सैन्याधिकारी हुतात्मा आणि ५७ घायाळ झाले.

मेजर डीपी सिंह

४ ए. युद्धात दोन्ही पाय गमावूनही मॅरेथॉन जिंकणारे मेजर डीपी सिंह ! : या लढाईमध्ये मेजर डीपी सिंह यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले. त्यानंतर त्यांनी कृत्रिम पाय लावले. आज ते कृत्रिम पायांवर पळतात. एवढेच नाही, तर ते स्पर्धांतही सहभागी होतात. त्यांना ‘ब्लेड रनर’ संबोधण्यात येते. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला असून ३ मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले होते. त्या वेळी ‘१३ जेएकेआर्आयएफ्’चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जोशी होते. आज तेच या नॉर्दन कमांड भागाचे लेफ्टनंट जनरलच्या हुद्यावर भारतीय सैन्याचे प्रमुख आहेत. ‘ऑपरेशन विजय’ हे त्या तरुण सैनिकांचे युद्ध होते. त्यांनी केवळ शूरता आणि नेतृत्व या गुणांवर युद्ध जिंकले. तेथे तंत्रज्ञानाचा काहीही लाभ नव्हता. भारतीय सैन्याला अतिशय उंच ठिकाणी लढावे लागले. त्यांनी महापराक्रम गाजवून युद्ध जिंकले. ‘तुमच्या उद्याकरता आम्ही आमचे आज दिले’, हे प्रसिद्ध वाक्य आज येथे सार्थ होते. या सैनिकांची आठवण म्हणून द्रास (कारगिल येथील थंड हवेचे ठिकाण) येथे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. तसेच तेथे संग्रहालयही आहे. तेथे अनेक पर्यटक जाऊ शकतात. तेथे कारगिल लढाई कशी लढली गेली, याविषयी माहिती देण्यात येते. तेथून ती शिखरे दिसतात. ती पाहिली, तर एवढ्या उंचीवर आपले शूर सैनिक लढले, हे पाहून आपले मस्तक आपोआप त्यांच्यासमोर झुकते.

५. ज्या सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे, त्यांचे महत्त्व न्यून होऊ देऊ नका ! : आपल्या देशात पराक्रम किंवा बलीदान यांना जे महत्त्व दिले पाहिजे, ते दिले जात नाही. आपल्याकडे खेळाडू, नट-नट्या, गुन्हेगार यांना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली जाते; परंतु जेव्हा भारतीय सैनिक आतंकवाद्यांशी लढतांना हुतात्मा होतात, तेव्हा त्या सैनिकांचे नावही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नाहीत. अलीकडेच एक सुभेदार स्तरावरील अधिकारी आणि एक सैनिक हुतात्मा झाले. तेव्हा त्यांची नावे वृत्तपत्रात शोधूनही सापडली नाहीत. मला वाटते, ‘या खरोखरच्या नायकांमुळेच देश सुरक्षित आहे. त्यामुळे त्यांना आपण पुरेसे महत्त्व दिले पाहिजे.’ आपण जरी कारगिल लढाई जिंकलो, तरीही पाकिस्तान आणि चीन यांच्या विरोधातील लढाई, म्हणजे ‘हायब्रिड वार’ अजूनही चालू आहे. जे राष्ट्र त्याच्या सैनिकांना विसरते, ते कधीही मोठे होऊ शकत नाही. आज देशाच्या सुरक्षेला बहुआयामी धोके आहेत. या धोक्यांना तोंड द्यायचे असेल आणि देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर सर्व नागरिकांनी एक सैनिक होण्याची आवश्यकता आहे. देशातील समस्यांवर देशभक्ती आणि देशप्रेम हे एकच उत्तर आहे. ‘मी देशासाठी काय करू शकतो ?’ असा प्रश्न विचारला, तर आपल्याला लक्षात येईल की, एक सामान्य व्यक्ती देशाच्या प्रगतीसाठी अनेक गोष्टी करू शकते. देशासाठी पाणी, वीज, इंधन वाचवण्यासारख्या लहान लहान गोष्टी नेहमीच्या जीवनात आचरणात आणू शकते. आपण आपल्या देशासाठी योगदान दिले, तर या देशाला मोठे करण्यासाठी आपण नक्कीच साहाय्य करू शकतो.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.