सिंधुदुर्ग – प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देतांना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. ‘प्रेरणा’ उपक्रमाच्या अंतर्गत स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून पहिल्या ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन सत्राचे १८ ऑगस्टला आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, साहाय्यक जिल्हाधिकारी संजीता महोपात्रा यांनी विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘पूर्वपरीक्षेसाठी विषयाची निवड करतांना आपल्या आवडीच्या विषयाची निवड करावी. या परीक्षांना सामोरे जातांना विषयाची निवड, अभ्यासक्रम, पुस्तकांची निवड यांसह मुलाखतीची सिद्धता करणेही महत्त्वाची असते. शिकवणीचा (कोचिंग क्लासेसचा) लाभ होतो. त्यामुळे अभ्यासाची वातावरणनिर्मिती होत असते. अभ्यास करत असतांना त्याचे वेळापत्रक सिद्ध करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रश्नपत्रिका सोडवतांना वेळेचे नियोजन केले पाहिजे, यासाठी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला पाहिजे. या सर्व सिद्धतेसह मनोबल राखण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. तुम्हाला जर संगीत आवडत असेल, तर दिवसातील काही वेळ ते ऐका. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला साहाय्यच होणार आहे. केवळ अभ्यास करणे आणि इतर गोष्टी न करणे, असे करू नका. नियमितपणे वर्तमानपत्रे वाचावीत. प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती असली पाहिजे.’’
या वेळी विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, विषयांची निवड, अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत आणि तंत्र यांसह विविध विषयांची सिद्धता करण्यासाठी करायचे नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यात प्रेरणा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे पहिलेच सत्र आयोजित करण्यात आले होते. पुढील सत्रांमध्ये भाषा, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा यांविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.