तालिबानवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, त्यांना अफगाणिस्तान नष्ट करायचे आहे !

गोवा विद्यापिठात शिकत असलेली अफगाणिस्तानची विद्यार्थिनी फयेझा अक्शरे हिचा दावा

पणजी, १८ ऑगस्ट (वार्ता.) – तालिबानवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, त्यांना अफगाणिस्तान पूर्ण नष्ट करायचे आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून मी अस्वस्थ झाले आहे. माझे अभ्यासाकडेही लक्ष लागत नाही. मला माझे अफगाणिस्तानमध्ये असलेले कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याविषयी चिंता वाटत आहे, असे मत गोवा विद्यापिठात पदवी शिक्षण घेणारी मूळची अफगाणिस्तान येथील विद्यार्थिनी फयेझा अक्शरे हिने एका खासगी वृत्तवाहिनीकडे व्यक्त केले. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्याच्या पार्श्‍वभूमीवर फयेझा अक्शरे बोलत होती.

ती पुढे म्हणाली, ‘‘अफगाणिस्तान ही माझी मातृभूमी असूनही मला तेथे जावे असे वाटत नाही. माझे पूर्ण कुटुंब अफगाणिस्तानमध्ये रहाते. मी माझ्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे; परंतु आता तेथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. मी माझ्या कुटुंबियांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढून त्यांना आता दुसर्‍या देशात नेणार आहे. तालिबान स्वत:ला चांगले असल्याचे भासवत असले, तरी त्यांच्यावर कुणीही विश्‍वास ठेवू नये. तालिबानी आतंकवादी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन अफगाणिस्तानमध्ये आलेले आहेत. ते महिलांना ‘एकट्या घराबाहेर पडू नका’, असे सांगतात आणि मुलींना शिक्षण घ्यायला देत नाहीत. २५ वर्षांपूर्वी त्यांनी अफगाणिस्तानमध्ये महिलांवर अत्याचार केले होते. इतर देशांकडून निधी मिळावा; म्हणून ते स्वत:ला चांगले असल्याचे भासवत आहेत. भारत हा सर्व धर्मियांचा सन्मान करणारा एक देश आहे. भारत देश नेहमी अफगाणिस्तानी लोकांना सहकार्य करत आहे. येथे महिलांवर कोणतेही निर्बंध नाहीत.’’