…अखेर काश्मीर येथील लालचौकातील घंटाघर तिरंगा रंगात न्हाऊन निघाले !

श्रीनगरमधील लालचौकातील घंटाघर

भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये भारताचा राष्ध्वज असलेला तिरंगा फडकावणे म्हणजे एकेकाळी कारागृहात सडणे होते. तेथील धर्मांध नेते ते सामान्य धर्मांध ‘ज्याने स्वत:च्या आईचे दूध प्यायले असेल, त्याने काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवावा’, असे आव्हान देत असत. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांपूर्वी काश्मीर खोर्‍यात आणि विशेषतः श्रीनगरमध्ये वरील घोषणेची भित्तीपत्रके लावली जात असत. भारतियांचा सन्मान आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेला हा तिरंगा ध्वज तेथे फडकावणे हे केवळ स्वप्नच होते; परंतु ५ ऑगस्ट २०१९ हा सोन्याचा दिवस उगवला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी स्वत:च्या राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर भारतापासून काश्मीरला वेगळे करणारी ‘३७० अन् ३५ अ’ ही विषवल्ली मुळासकट उपटून टाकली. समस्त भारतियांच्या अंतःकरणातील राष्ट्रभक्तीच्या मिणमिणत्या ज्योतीवरील काजळी काढली. त्यामुळे आज तीच राष्ट्रभक्तीची ज्योत २०२१ च्या स्वातंत्र्यदिनापूर्वीच श्रीनगरमधील लालचौकातील ‘घंटाघर’ नावाच्या वास्तूत तिरंग्याच्या रंगात झळकते आहे आणि संपूर्ण विश्वाला आसेतुहिमाचल ‘एक भारत, श्रेष्ठ भारत, विश्ववंद्य भारत अन् विश्वगुरु भारत’ हा संदेश मोठ्या अभिमानाने देत आहे.