दिव्यांग, कोरोनाबाधित आणि ८० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक यांना घरूनच मतदानाची सुविधा देणार

आगामी विधानसभा निवडणूक

पणजी, १३ ऑगस्ट (वार्ता.) – आगामी राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिव्यांग व्यक्ती, कोरोनाबाधित नागरिक आणि ८० वर्षांवरील व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा दिली जाईल. निवडणूक अधिकारी मतपेट्या घेऊन संबंधित घराला भेट देतील, असा निर्णय मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी आगामी विधानसभा निवडणुकीविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी १२ ऑगस्टला सर्व राजकीय पक्षांसमवेत बैठक आयोजित केली होती. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर १ सहस्र मतदार ही मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे मतदानाच्या वेळी गर्दी होणार नाही. या बैठकीत १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मतदार सूचीची उजळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रत्येक मासात गोव्यात उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्य निवडणूक अधिकारी बैठक घेणार आहेत. गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. वर्ष २०१७ मध्ये निवडून आलेल्या सध्याच्या विधानसभेची मुदत १५ मार्च २०२२ या दिवशी संपणार आहे.

अपंग किंवा विकलांग यांना ‘दिव्यांग’ म्हणणे आध्यात्मिदृष्ट्या अयोग्य !

‘केंद्रशासनाच्या आदेशानुसार सर्वत्र अपंग, विकलांग यांना ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग सध्या प्रचलित करण्यात आला आहे.  अध्यात्माच्या दृष्टीने दिव्यांगाचा अर्थ पाहिल्यास ‘दिव्य + अंग = दिव्यांग’ होय. दिव्य म्हणजे दैवी किंवा सूक्ष्म (म्हणजे लौकिकदृष्ट्या डोळ्यांना न दिसणारे) होय. यावरून दिव्यांग या शब्दाचा अर्थ ‘दैवी किंवा डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म अंग’ असाही होतो. त्यामुळे अपंग किंवा विकलांग या शब्दांसाठी ‘दिव्यांग’ शब्द वापरणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य ठरते.’