संस्कृत भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, हिंदु जनजागृती समिती

चेन्नई (तमिळनाडू) येथे ‘संस्कृत भारती, अण्णानगर’च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

चेन्नई – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने जगभरातील विविध भाषांमधून निर्माण होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांविषयी संशोधन केले आहे. यात संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व लक्षात आले आहे. संस्कृत भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन येथील हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केले. ‘संस्कृत भारती, अण्णानगर’च्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची वंदनीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाला संबोधित करतांना पू. (सौ.) रविचंद्रन् यांनी ‘संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व’ यांविषयीची माहिती उपस्थितांना सांगितली. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाषणे, गाणे आणि संस्कृत भाषेमध्ये संभाषण आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाला महिला पतंजलि योग समितीच्या योगाचार्य सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् आणि संस्कृत भारतीच्या शिक्षणप्रमुख सौ. नित्या यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता.

क्षणचित्र

संस्कृत भारतीच्या सौ. लता चौहान हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांमध्ये सहभागी होतात. त्यांनी या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमासाठी समितीला आमंत्रित केले होते.