१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेल्या अत्तराचा सुगंध घेतल्यावर साधिकेला बर्फाच्छादित पर्वत अन् देवीचे चरण दिसणे
‘३.७.२०२१ या दिवशी मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचे कपडे धुण्याची सेवा मिळाली. मी धुतलेले कपडे खोलीत वाळत घालत होते. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांनी मला विचारले, ‘‘तुला अत्तर लावायला आवडते का ?’’ त्यावर मी ‘हो’ म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘हे घे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेले अत्तर आहे.’’ त्यांनी माझ्या हाताला अत्तर लावले. अत्तराचा सुगंध घेतल्यावर मला पुष्कळ चांगले वाटले. ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी दिलेले अत्तर होते; म्हणून मी मूठ तशीच ठेवून माझ्या मुठीलाच डोके लावून नमस्कार केला. त्या वेळी मला बर्फाच्छादित पर्वत आणि देवीचे चरण दिसले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कपडे धुतल्यावर साधिकेला असाच सुगंध येणे आणि ‘हा देवीच्या चरणांचा सुगंध आहे’, असे तिला वाटणे
त्यानंतर मी स्वयंपाकघरात एका सेवेसाठी गेले. तेव्हा मी वरील प्रसंगाचे चिंतन केले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कपडे धुवायचे. तेव्हाही मला असाच सुगंध यायचा.’ ‘हा देवीच्या चरणांचा सुगंध आहे’, असे मला वाटले.
३. सद्गुरु पिंगळेकाकांनी मला अत्तर लावले. तेव्हा ‘मी चैतन्याच्या झर्यात न्हाऊन निघाले’, असे मला वाटले.
४. अत्तर लावल्यावर माझ्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरले. त्यामुळे माझ्याभोवती असलेले त्रासदायक, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे आवरण नष्ट होऊन मला पुष्कळ हलके वाटले.
‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सद्गुरूंची प्रीती अन् कृपा अनुभवता आली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. विशाखा चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |