‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन केल्यामुळे ‘सनबर्न बीच क्लब’ पाडण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ‘सनबर्न’च्या आयोजकांचा निर्णय
पणजी, ६ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात ‘सनबर्न’ या ‘इ.डी.एम्.’चे (‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’) आयोजन करणार्या ‘पर्सेप्ट लाईव्ह’ आस्थापनाने ‘डेन लिकर, गोवा’ यांच्या ‘सनबर्न बीच क्लब’शी असलेला करार रहित केला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये हा करार झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गत आठवड्यात ‘किनारपट्टी नियमन क्षेत्रा’चे (‘सी.आर्.झेड्.’- ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे) उल्लंघन करून वागातोर येथे ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये (बांधकाम करता न येणारा विभाग) बांधण्यात आलेला ‘सनबर्न बीच क्लब’ पाडण्याचा आदेश दिला आहे. (‘सनबर्न बीच क्लब’ किनारपट्टी नियमन क्षेत्राचे उल्लंघन करून बांधण्यात येत असतांना प्रशासन काय करत होते ? कुणाच्या तरी तक्रारीनंतर न्यायालयाला याची नोंद घेऊन या क्लबचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश द्यावा लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) या पार्श्वभूमीवर ‘सनबर्न’च्या आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.
‘सनबर्न’च्या आयोजकांनी याविषयी अधिक माहिती देतांना एक प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध केले आहे. यात ते म्हणतात, ‘‘सनबर्न’ गेली १४ वर्षे गोव्यात अस्तित्वात असतांना नेहमी कायद्याचे पालन केले आहे. ‘सनबर्न बीच क्लब’ चालू झाल्यावर तो केवळ ७ दिवस चालू शकला आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तो बंदच होता.’’