मुंबई – कोकणामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-कनेडी राज्यमार्गावरील नाटळ येथील मल्हारी नदीवरील मल्हार पूल कोसळला होता. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. हा पूल कोसळल्यामुळे नाटळ, दिगवळे, नरवडे यांसह १० गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी त्वरित चालू करण्याचे निर्देश दिले आहेत.
नुकत्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. त्यातच नाटळ येथे मल्हार नदीवर अनुमाने ५७ वर्षांपूर्वी बांधलेल्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला होता. या पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विशेष गोष्ट म्हणून लगेचच संमत केला, असे चव्हाण यांनी सांगितले.