देशातील सर्वांत मोठ्या अभ्यासाचा निष्कर्ष
नवी देहली – कोविशिल्ड लस घेणार्यांसाठी कोरोनाचा धोका ९३ टक्के न्यून झाला आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. देशात सर्वप्रथम सशस्र दलांचे १५ लाख ९० सहस्राहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ यांना कोविशिल्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यांच्यामध्ये ‘ब्रेक-थ्रू इन्फेक्शन’ ९३ टक्के न्यून झाल्याचे दिसून आले. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या निष्कर्षामुळे लसींविषयी असलेल्या लोकांच्या शंका दूर होण्यास निश्चित साहाय्य होईल.
१. चंदीगडच्या ‘पीजीआय’ येथे ‘आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज’ने ‘ब्रेक थ्रू इन्फेक्शन’च्या प्रमाणावर देशातील सर्वांत मोठा अभ्यास केला. त्याप्रमाणे देशात लसीकरण झाल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ १.६ टक्के असल्याचे दिसून आले. याचा अर्थ दोन्ही डोस घेतलेल्या १ सहस्र लोकांपैकी केवळ १६ जणांना कोरोनाची लागण होऊ शकते.
२. व्यक्तीने दोन्ही डोस घेऊन दोन आठवडे झाल्यानंतरच त्याला पूर्णपणे ‘व्हॅक्सिनेटेड’ म्हटले जाते. त्यांच्या अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या या अभ्यासातील प्राथमिक निष्कर्ष घोषित करण्यात आले आहेत. या अभ्यासाला ‘विन-विन कोहोर्ट’ असे नाव देण्यात आले. ही माहिती ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
३. ‘महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च’च्या संचालकांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या २० सरकारी कोविड केअर सेंटरचा अभ्यास केला. त्याप्रमाणे रुग्णालयात उपचारासाठी भरती होणार्यांपैकी ८७.५ टक्के लोकांनी लसीचा डोस घेतला नव्हता, असे आढळून आले.
४. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, या लसीकरणामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता फारच अल्प आहे; परंतु कोणतीच लस ही कोरोना न होण्याची १०० टक्के निश्चिती देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना काळातील निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.