कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहित !

प्रियकरावर असे प्रेम करणारी प्रेयसी दुर्मिळच म्हणावी लागेल !

नवी देहली – कारगिल युद्धात विजय मिळवण्याला २६ जुलै या दिवशी २२ वर्षे झाली. कारगिल युद्धात अनेक सैनिक आणि अधिकारी हुतात्मा झाले. त्यात कॅप्टन विक्रम बत्रा यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ नावाचा हिंदी चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात कॅप्टन बत्रा यांची प्रेमकथाही दाखवण्यात येणार आहे. कॅप्टन बत्रा यांच्या प्रेयसीने त्यांच्या हौतात्म्यानंतर विवाह न करण्याचा निर्णय घेतला आणि आजही ती अविवाहित आहे. डिंपल छीमा असे या प्रेयसीचे नाव आहे.

१. वर्ष १९९५ मध्ये पंजाब विद्यापिठात डिंपल छीमा आणि कॅप्टन बत्रा यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. ‘आमची भेट घडवून आणण्यासाठीचा तो सर्व खेळ नियतीचाच होता’, असे डिंपल यांनी सांगितले. विद्यापिठात प्रवेश मिळाल्यानंतर काही काळातच बत्रा यांना डेहराडून येथे असणार्‍या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला होता. तोपर्यंत ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

२. एके दिवशी मनसा देवी येथे या दोघांनी भेट दिली असता त्यांनी एकत्रित प्रदक्षिणा घातली. त्या वेळी बत्रा यांनी डिंपल यांच्या ओढणीचे टोक पकडले होते. यावर कॅप्टन बत्रा म्हणाले, ‘आजपासून तुम्ही ‘सौ. बत्रा’ बनल्या आहात. आपण ४ फेरे घातले आहेत.’ त्यानंतर विक्रम बत्रा यांनी पाकिटातून ब्लेड काढले आणि अंगठा कापला. यानंतर अंगठ्याने त्यांनी डिंपल यांचा भांग रक्ताने भरला. ‘हा जीवनातील सर्वांत अनमोल क्षण होता’, असे डिंपल यांनी सांगितले. त्यानंतर कारगिल युद्ध चालू झाल्याने कॅप्टन बत्रा यांना युद्धासाठी जावे लागले आणि तेथेच ते हुतात्मा झाले. यानंतर डिंपल यांनी कधीही विवाह न करण्याचा निर्णय घेतला.