विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते आदरयुक्त होण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

कोर्टी (जिल्हा सोलापूर) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

श्री. मनोज खाडये

कोर्टी (जिल्हा सोलापूर) – सद्य:स्थितीत उत्तम शिक्षक होण्यासाठी स्वतःचे आचरण चांगले असायला हवे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते आदरयुक्त होण्यासाठी नैतिक मूल्यांची आवश्यकता आहे. यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील ‘न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड मॅनेजमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालय’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘उत्तम शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यामध्ये नैतिक मूल्यांची जोपासना’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

‘सध्याच्या धावत्या जीवनपद्धतीत अध्यात्माची आवश्यकता का आहे ? तसेच आपल्यातील स्वभावदोष वैयक्तिक आणि सामजिक जीवनात कसे हानीकारक ठरतात ? अन् त्यामुळे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून नैतिक जीवन जगण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी करावयाचे प्रयत्न’ यांविषयी श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ महाविद्यालयातील ३० प्राध्यापकांनी घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि संचलन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांनी उत्स्फूर्तपणे केले होते.

क्षणचित्र

या वेळी अनेक प्राध्यापकांनी ‘असे व्याख्यान वारंवार व्हावे’, अशी इच्छा व्यक्त केली.