नवी देहली – भारतीय पोस्टातून आता पारपत्रही बनवून घेता येणार आहे. भारतीय पोस्ट खात्याने याची माहिती ट्वीट करून दिली आहे. यात म्हटले आहे, ‘पोस्टातील सी.एस्.सी. काऊंटरवर पारपत्रासाठी नोंदणी आणि अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्टला भेट द्या.’ नोंदणी आणि अर्ज ऑनलाईनही करता येऊ शकतो. यासाठी पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. यानंतर पारपत्रासाठी ऑनलाईन शुल्क आणि अर्ज जमा करावा लागतो. असे केल्यावर दिनांक दिला जाईल आणि त्या त्या दिवशी कागदपत्रांसह जवळच्या पोस्टात जावे लागेल.
जन्माचा दाखला, १० वी किंवा १२ वीचे निकालपत्र, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, शिधावाटप पत्र आणि नोटरीद्वारे केलेले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे लागतील. पोस्टामध्ये यांची सत्यता पडताळली जाईल. कागदपत्रे योग्य आढळल्यास प्रक्रिया पुढे जाईल. या वेळी अर्जदाराच्या बोटांचे ठसे घेतले जातील, तसेच डोळे स्कॅन केले जातील. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुढील प्रक्रियेस १५ दिवस लागतील. यानंतर पारपत्र मिळेल.