निवडणुकीत पैसे वाटल्याच्या प्रकरणी तेलंगण राष्ट्र समितीच्या महिला खासदाराला ६ मासांच्या कारावासाची शिक्षा !

देशातील पहिलीच घटना !

  • अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने वावरणार्‍या महिला आता गुन्हेगारीतही पुरुषांपेक्षा मागे नाहीत, हेच यावरून स्पष्ट होते !
  • निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे द्यावे लागणे, याचा अर्थ स्वतःची अकार्यक्षमता मान्य करणे होय ! असे भ्रष्ट उमेदवार निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार न वाढल्यासच नवल !
  • कुठे सर्वार्थाने आदर्श राज्यव्यवस्था देणारे प्रभु श्रीराम, तर कुठे स्वतः भ्रष्टाचार करणारे आणि जनतेलाही तो करायला शिकवणारे हल्लीचे समाजद्रोही लोकप्रतिनिधी !
  • भारतात होणार्‍या निवडणुका, म्हणजे गुंड आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांनी लोभी मतदारांना पैसे देऊन किंवा स्वस्त अन्नधान्य देण्याचे आमीष दाखवून त्यांची मते अन् स्वाभिमान विकत घेणेे होय ! हे चित्र जनतेला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
मलोत कविता

भाग्यनगर – वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटल्याच्या प्रकरणी तेलंगाणातील महबूबाबादच्या विद्यमान खासदार तथा राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्रीय समिती पक्षाच्या नेत्या मलोत कविता यांना नामपल्लीमधील विशेष सत्र न्यायालयाने १० सहस्र रुपये दंढ आणि ६ मासांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

विशेष सत्र न्यायालयाच्या या निकालाला मलोत कविता उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, असे बोलले जात आहे. एका विद्यमान महिला खासदाराला अशी शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

महिला खासदाराला शिक्षा होण्याची देशातील पहिलीच घटना

एका मतासाठी दिले जात होते ५०० रुपये !

वर्ष २०१९ मध्ये महसुल विभागाच्या अधिकार्‍यांनी मलोत कविता यांचा सहकारी शौकत अली याला पैसे वाटतांना रंगेहात पकडले होते. शौकत अली बर्गमपहाड परिसरातील मतदारांना एका मतासाठी ५०० रुपये वाटत होता. यानंतर पोलिसांनी शौकत अली आणि मलोत कविता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. चौकशीच्या वेळी शौकत अली याने आरोप मान्य करत कविता यांच्या सांगण्यावरुन पैसे वाटल्याची स्वीकृती दिली.