म्यानमारवरील परिस्थितीवर चीनचे लक्ष, तर चीनवर आमचे लक्ष ! – सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत

आता चीनवर लक्ष ठेवणे पुरेसे नसून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच भारताच्या हिताचे आहे, असे जनतेला वाटते ! 

जनरल बिपिन रावत

नवी देहली – म्यानमारमध्ये तेथील सैन्याने सत्तापालट करून नियंत्रण मिळवल्यापासून चीन पडद्याआडून म्यानमारवर लक्ष ठेवून आहे, तर भारत तेथील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यासह चीनवरही लक्ष ठेवून आहे, अशी माहिती चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी एका वेबिनारमध्ये (ऑनलाईन परिषदेमध्ये) दिली. ‘भारताच्या ईशान्य भाग सिलीगुडी कॉरिडोर म्हणजे ‘चिकन नेक’ या निमुळत्या क्षेत्रामुळे उर्वरित भारताशी जोडलेला आहे. त्याला सैन्य रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. यामुळेच चीन म्यानमारवर लक्ष ठेवून आहे, असे रावत यांनी स्पष्ट केले. ईशान्य भारताला लागून म्यानमारची सीमा आहे. जर चीनने म्यानमारमध्ये त्याच्या महामार्ग प्रकल्पाद्वारे प्रवेश केला, तर तो ‘चिकन नेक’वर आक्रमणाच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. त्यामुळे भारताला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर जनरल रावत बोलत होते.

जनरल रावत म्हणाले की, ईशान्य भारतात धर्मांध इस्लामी गटांद्वारे अशांतता निर्माण करण्यासाठी रोहिंग्या शरणार्थींचा वापर करून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. (असे आहे, तर अशा शरणार्थींना भारत त्यांच्या देशात हाकलून क लावत नाही ? – संपादक) चीन व्यतिरिक्त ईशान्य भारतात अमली पदार्थांची तस्करी, बंडखोरांच्या कारवाया आदी गोष्टीही सुरक्षेसाठी चिंताजनक आहेत. (सीमेवर सैन्य तैनात असतांना अमली पदार्थांची तस्करी होतेच कशी ? – संपादक)