(म्हणे) ‘फेब्रुवारी मासात भारतासमवेत गुप्त बैठक झाली !’ – पाकिस्तानचा कांगावा

पाकिस्तान डावपेचांत भारतापेक्षा हुशार ! असे वक्तव्य करून भारतियांच्या मनात सरकारविषयी शंका निर्माण करून देशात अस्थिरता पसरवण्याचा पाकचा डाव आहे  ! पाकच्या या धूर्तपणाला सरकार कसे उत्तर देणार आहे ?

भारतविरोधी गरळओक करणारे भारतीय वृत्तसंकेतस्थळ

इस्लामाबाद – फेब्रुवारी मासात भारतासमवेत गुप्त बैठक झाली असल्याचा कांगावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला. (शत्रू राष्ट्राला मुलाखत देण्यासाठी भारतविरोधी गरळओक करणारे भारतीय वृत्तसंकेतस्थळच सापडते, हे लक्षात घ्या ! – संपादक) दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्यासाठीची आशा अद्यापही मावळलेली नाही. त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ही बैठक नेमकी कुठे झाली ? आणि त्यात दोन्ही देशांकडून कोण कोण उपस्थित होते ? यांविषयी मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

युसुफ पुढे म्हणाले की, वर्ष २००३ नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू झाली. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होण्याची आशा निर्माण झाली होती. आता झालेली गुप्त बैठक ही वर्ष २००३ प्रमाणे शस्त्रसंधी लागू करण्याविषयी होती. संबंध सुरळीत होण्यासाठी भारताकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होणार असतील, तर त्यासाठी पाकिस्तानचीही सिद्धता आहे.