|
देवगड – तालुक्यातील तारामुंबरी येथील समुद्रकिनार्यावर १८ जुलैला सकाळी अनुमाने ५ किलो वजनाची देवमाशाची (‘व्हेल’ची) उलटी येथील मासेमार उमाकांत उपाख्य कांतू विठ्ठल कुबल यांना आढळली. त्यांनी तात्काळ याविषयी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी ही उलटी कह्यात घेतली. उलटी प्रामाणिकपणे वनविभागाकडे सुपुर्द करणारे कुबल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवमाशाच्या उलटीला कोट्यवधी रुपये मूल्य असल्याने याची मोठ्या प्रमाणात तस्करीही होते.
देवगड येथील शिवनगर येथे रहाणारे उमाकांत कुबल हे १८ जुलैला मासेमारी करण्यासाठी तारामुंबरी समुद्रकिनारी गेले होते. त्या वेळी त्यांना किनार्यावर एक विशिष्ट पदार्थ आढळला. अशा प्रकारचा पदार्थ त्यांनी प्रथमच पाहिला होता. त्यामुळे त्या पदार्थाची छायाचित्रे काढून त्यांनी मुंबई येथे मत्स्य संशोधन संस्थेत पाठवली. त्यानंतर या संस्थेकडून हा पदार्थ म्हणजे देवमाशाची उलटी असल्याचे कुबल यांना सांगितले गेले.