मडगाव, १९ जुलै (वार्ता.) – गोव्यातील पर्तगाळी (काणकोण) येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधिपती प.पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांनी १९ जुलैला सकाळी ११.४५ वाजता पर्तगाळी मठात देहत्याग केला. त्यांच्या पार्थिवाला १९ जुलैच्या रात्री ८ वाजता समाधी देण्यात आली. या वेळी ‘स्वामीजींचे भक्त आणि समाजबांधव यांनी गौड सारस्वत समाजाच्या सर्व मंदिरांमध्ये स्वामीजींच्या प्रतिमेला हार घालून दीपप्रज्वलन करून भजने म्हणावीत’, असे आवाहन गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर असोसिएशनने केले. स्वामीजींचे शिष्य प.पू. श्रीमद् विद्याधीश तीर्थ यांच्या सांगण्यानुसार प.पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजींना समाधी देण्याचा कार्यक्रम कोरोनाविषयक नियम पाळून करण्यात आला. ‘गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे. त्यामुळे भाविकांनी आपापल्या घरूनच प्रार्थना करावी’, असे आवाहन काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांनी केले. स्वामीजींनी देशातील जीर्णावस्थेतील अनेक मठांना ऊर्जितावस्था आणण्याचे कार्य केले होते.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी पर्तगाळी मठाधिशांच्या देहत्यागाविषयी शोक व्यक्त केला आहे.
स्वामीजींचे योगदान नेहमीच स्मरणात राहील ! – दिगंबर कामत
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधिपती प.पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ आणि माझे गुरु यांना माझा प्रणाम ! त्यांचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांत असलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. सर्व मठानुयायी आणि त्यांचे जगभरातील भक्त यांच्या दुःखात मी सहभागी आहे. – श्री. दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते, गोवा.