‘उद्या (२० जुलै या दिवशी) आषाढी एकादशी आहे. सर्वजण विठ्ठलाच्या आठवणीत दंग आहेत. तसेच विठ्ठलाच्या भजनात सर्वजण तल्लीन होतात; पण ज्या भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभे केले, त्या पुंडलिकाची मातृ-पितृृ भक्ती मात्र आज समाजात उरली आहे का ?
आई-वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने प्रत्यक्ष विठ्ठलाला सुद्धा ‘विटेवर उभे रहा’, असे सांगितले. पुंडलिकासाठी आई-वडिलांची सेवा विठ्ठलापेक्षाही महत्त्वाची होती. ती त्याची अलौकिक सेवा पाहून विठ्ठल त्याच्यासाठी धावून आला; पण पुंडलिकाने स्वतःचे सेवाव्रत सोडले नाही. त्याने आपले आई-वडील हेच देवाच्या ठिकाणी मानले आणि त्यांची सेवा हा एकच धर्म पाळला.
पालकांविषयी आजची दुःखदायक स्थिती
आज अनेक वृद्धाश्रम वृद्धांना निवारा आणि सुखसोयी देत आहेत. पोटची मुले वृद्धाश्रमातील या वृद्धांना (वृद्ध आई-वडिलांना) भेटायला सुद्धा फार अल्प वेळा येतात. हीच मुले विठ्ठलाचा जयघोष करत असतात. सर्वप्रथम आपण आपल्या आई-वडिलांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या थकलेल्या अवयवांना तुमच्या तारुण्याचे बळ द्या. त्यांना योग्य मान द्या. त्यांच्या उरलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारा. त्यांना तीर्थक्षेत्री घेऊन जा. एवढे केले, तरी विठ्ठल तुमच्याकडे धावत येईल आणि तो तुमच्यावर प्रसन्न होईल.’
– पू. किरण फाटक, ठाणे (२०.७.२०२१)