बोगमाळो, वास्को येथे गोळीबार करून एकाची हत्या : २ संशयित पोलिसांच्या कह्यात

घटनेनंतर १२ घंट्यांत पोलिसांनी संशयितांना पकडले : मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक

संशयितांचे वाहन (कार) एका खड्ड्यात पडले

पणजी, १६ जुलै (वार्ता.) – बोगमाळो, वास्को येथे १५ जुलै या दिवशी दिवसाढवळ्या गोळीबार झाला. भाड्याची गाडी घेऊन आलेल्या २ संशयितांनी नवे वाडे येथील अमर नाईक (वय ३० वर्ष ) याच्या डोक्यावर गोळी झाडली आणि या वेळी प्रसंगावधान राखल्याने अमर नाईक याचा मित्र प्रीतेश कुट्टीकर याच्यावर संशयित गोळी झाडू शकले नाहीत. अमर नाईक याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता रात्री उपचार चालू असतांना त्याचे निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी २ संशयितांना घटनेनंतर १२ घंट्याच्या आत कह्यात घेतले आहे. वास्को, मुरगाव, वेर्णा , विमानतळ आणि रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कह्यात घेतलेले दोघेही संशयित उत्तरप्रदेश येथील असून ते मागील आठवडाभर मुंबई येथे होते. या प्रकरणी दोन्ही संशयितांना ७ दिवस पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि गोळीबार प्रकरणामागील हेतू शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

गोवा पोलिसांनी अशी केली कारवाई !

बोगमाळो येथील घटनेनंतर तेथून पलायन करतांना संशयितांचे वाहन (कार) एका खड्ड्यात पडले आणि संशयितांनी वाहन तेथेच सोडून तेथून पलायन केले होते. ‘दोघेही संशयित गोव्याबाहेरील आहेत आणि वास्को परिसरात ते दडून रात्रीच्या वेळी पळून जाण्याचा प्रयत्न करतील’, असा पोलिसांना अंदाज होता. यामुळे पोलिसांनी वास्को येथून जाणार्‍या मालगाडीवर विशेष नजर ठेवली होती. अखेर उत्तररात्री कासावली रेल्वेस्थानक परिसरात मालगाडीला लटकण्यासाठी आलेल्या दोन्ही संशयितांना पोलिसांनी कह्यात घेतले. मारेकरी

पूर्व सिद्धतेनिशी गोव्यात आले होते. निवासासाठी किंवा वाहन भाड्याने घेण्यासाठी ओळखपत्र मागितले जात असल्याने त्यांनी इतर व्यक्तींची २ बनावट ओळखपत्रे समवेत आणली होती. घटनेनंतर ही ओळखपत्रे त्यांनी तेथेच टाकून पलायन केले होते. पोलिसांना प्राथमिक तपासणीतच ही ओळखपत्रे निराळ्याच व्यक्तींची असल्याचे आणि त्यांचा मारेकर्‍यांनी गैरवापर केल्याचा संशय आला होता. पोलिसांनी तातडीने मारेकर्‍यांनी हणजूण येथे वास्तव्य केलेल्या जागेची पहाणी केली आणि वाहन भाड्याने घेतलेल्या व्यक्तीशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती गोळा केली. ‘मारेकरी कसे दिसतात ?’, याची प्राथमिक माहिती गोळा करून ती वास्को परिसरातील सर्व पोलिसांना ‘व्हॉटस्ॲप’च्या माध्यमातून पाठवली. या माहितीच्या आधारे उत्तररात्री मालगाडीला लटकण्यासाठी आलेल्या मारेकर्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित ट्वीट करून गोवा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.