सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडीपर्यंत बनावट नोटांची साखळी !


सातारा, १५ जुलै (वार्ता.) – पुण्यातील निगडी पोलिसांनी बनावट नोटांची साखळी उघड केल्यानंतर आंतरराष्ट्रीय टोळीचे संबंध सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी गावापर्यंत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ढेबेवाडी परिसरात आश्‍चर्य व्यक्त केले जात असून बनावट नोटांना कोण कोण बळी पडले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणी निगडी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली असून त्यातील एकजण ढेबेवाडी येथे रहाणारा आहे; मात्र तो कायमस्वरूपी तेथील रहिवासी नाही. ढेबेवाडी परिसरात निगडी पोलिसांनी या संशयिताच्या हालचाली, संपर्क आदींची चौकशी केली. यावरून संशयिताने बनावट नोटा या ठिकाणी पसरवल्या नाहीत ना ? याचा तपास पोलीस करत आहेत. बनावट नोटांविषयी ढेबेवाडी पोलिसांकडे कोणत्याही तक्रारी आल्या नसून निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तपास चालू केला आहे, अशी माहिती ढेबेवाडी पोलिसांनी दिली.