राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदावरून राष्ट्रवादीच्या गुन्हेगार कार्यकर्त्याची हकालपट्टी !

पोलिसांच्या विरुद्धच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्यांची नियुक्ति होणे, हे गंभीर आणि लज्जास्पद आहे. अशा नेमणुका करण्यासाठी काही निकष नाहीत का ? असल्यास असा निर्णय घेणार्‍यांनाही शिक्षा होणे अपेक्षित आहे.

(डावीकडे) राजकुमार ढाकणे, (उजवीकडे) देवेंद्र फडणवीस

मुंबई – पोलिसांच्या विरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. त्याला सत्र न्यायालयाप्रमाणे समान अधिकार आहेत. १४ जुलै २०२० या दिवशी गृहविभागाने अधिसूचना प्रसिद्ध करून राष्ट्रवादी काँग्रेसचे गुन्हेगार कार्यकर्ते राजकुमार ढाकणे यांची या प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. ढाकणे यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये वर्ष २०१५ मध्ये राजकुमार ढाकणे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पुण्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राजकुमार ढाकणे यांना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहविभागाने याविषयी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.