निवृत्तीवेतनातून थकित रक्कम वसूल करण्याचा प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार !

  • ‘सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी संघटने’ची चेतावणी !

  • सेवानिवृत्तीच्या १५ ते २० वर्षांनंतर प्रशासनाला जाग

  • निधन झालेल्यांच्या नावेही रक्कम वसुलीची नोटीस 

सेवानिवृत्तीनंतर २० वर्षांनी रक्कम वसुलीसाठी नोटीस काढणारे झोपलेले प्रशासन !

मालवण – सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रामपंचायतीच्या थकित रक्कम वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. यातून थकित रकमेची वसुली निवृत्तीवेतनातून करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असून हा सर्व प्रकार वेळीच थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणी ‘सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी संघटने’चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश राणे यांनी दिली आहे. याविषयीचे निवेदन मालवणचे साहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले की, सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी सेवेत असतांना याची पूर्तता करून घेण्याची संधी असते. ‘ऑडिट’मध्ये निघालेल्या शंकांची पूर्तता करून घेऊन वसूलपात्र रक्कम वसूल करण्याची संधी असतांनाही, तसे न करता निवृत्तीवेतनातून ही रक्कम वजा करण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत आहे. खरे पहाता कर्मचारी निवृत होतो, त्या वेळी संबंधित अधिकार्‍यांकडून ‘सदर कर्मचार्‍याकडे शासकीय येणे बाकी काही नाही’, असे दाखले घेऊनच निवृत्तीवेतनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. असे असतांना अशा प्रकारच्या रकमांची वसुली निवृत्तीवेतनातून कशी होऊ शकते ? सेवानिवृत्त होऊन १५ ते २० वर्षे होऊन गेल्यावर संबंधित अधिकार्‍यांना याची कशी काय जाग येते ? काही सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे निधन झाले आहे. असे असतांना त्यांच्या नावे नोटीस येणे योग्य नाही. हा सगळा प्रकार वेळीच थांबवावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. (‘बैल गेला आणि झोपा केला’, या म्हणीची प्रचीती देणारा प्रशासनाचा कारभार ! सेवानिवृत्तीनंतर १५ ते २० वर्षांनी, तसेच निधन झालेल्यांच्या नावे रक्कम वसुलीची नोटीस काढण्याऐवजी १५ ते २० वर्षांपूर्वी ज्यांनी येणे बाकी नसल्याचा दाखला दिला, त्या प्रशासनातील अधिकार्‍यांकडूनच ही रक्कम का वसूल करू नये ? – संपादक)